विजय वडेट्टीवारांचा संताप : निवडणुका घेता कशाला ? भाजपला थेट विजयी घोषित करा !
नागपूर (3 डिसेंबर 2025) : निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर सत्ताधार्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी निवडणूक आयोगावर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका करताना निवडणूक आयोगाच्या अकलेचं दिवाळे निघाल्याचे सांगत थेट भाजपाला का विजयी करत नाही, असे म्हटले आहे. निवडणूक आयोगाच्या कारभारावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
काय म्हणाले वडेट्टीवार ?
निवडणूक प्रक्रियेवर ताशेरे ओढताना वडेट्टीवार यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर सडकून टीका केली. सात-आठ वर्षांनंतर निवडणुका होत आहेत, तरीही त्या व्यवस्थित घेता येत नसतील तर त्याला आयोग आणि राज्य सरकार दोन्ही जबाबदार आहेत. उद्या ईव्हीएम हॅक झाले किंवा त्यात फेरफार झाली, तर जबाबदार कोण? जर तुमच्या मनाप्रमाणेच सर्व करायचे असेल आणि ईव्हीएम मॅनेज करायचे असतील तर निवडणुकांचा फार्स कशाला करता? त्यापेक्षा भाजपला थेट विजयी घोषित करून टाका, असा खोचक टोला वडेट्टीवारांनी लगावला. देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
असा धिंगाणा कधीही पाहिली नाही
वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्रात यापूर्वी अनेक निवडणुका झाल्या, पण असा पोरखेळ आणि धिंगाणा कधीच पाहायला मिळाला नव्हता. सर्वोच्च न्यायालयाने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडू नये, असे स्पष्ट निर्देश दिले होते मात्र आयोगाने त्याचा कोणताही अभ्यास न करता कोणाच्या तरी दबावाखाली घाईघाईने तारखा जाहीर केल्या. यामुळेच हा सावळा गोंधळ निर्माण झाला..
आयोगाचे अधिकारी कोणाच्या इशार्यावर?
निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकार्यांच्या भूमिकेवरही वडेट्टीवार यांनी संशय व्यक्त केला. आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त कोणाच्या आदेशाची वाट पाहत आहेत आणि कोणाच्या सांगण्यावरून आदेश काढत आहेत, हे आम्हाला चांगलेच ठाऊक आहे. जर बुद्धी शाबूत असती, तर कोर्टाच्या आदेशाचा नीट अभ्यास केला असता. गेल्यावेळी 379 जागा रिक्त राहिल्या होत्या, आताही तीच परिस्थिती ओढवली आहे. हा सर्व गोंधळ आयोगाने घातला असून सत्ताधार्यांनी याचे आत्मचिंतन करावे, असे मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.


