मतदान वाढल्याचा आरोप : आष्ट्यात जयंत पाटलांनी घेतला आढावा
सांगली (3 डिसेंबर 2025) : सांगली जिल्ह्यातील आष्टा नगरपरिषदेच्या ईव्हीएम स्ट्राँगरुमबाहेर मोठ्या संख्येने मतदार, कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या यादीवरील नोंदीत तफावत असल्याचे म्हटल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा आमदार जयंत पाटील यांनी आष्टा येथे जाऊन स्ट्राँग रुमची पाहणी केली.
काय आहे नेमके प्रकरण ?
आष्टा नगरपरिषदेमधील मतदानात आणि प्रशासनाने जाहीर केलेल्या मतदानात तफावत असल्याचा आरोप मतदार व आघाडीच्या पदाधिकार्यांनी केला. प्रशासनाने रात्री दिलेल्या आकडेवारीत आणि सकाळी ऑनलाईन जाहीर केलेल्या आकडेवारीत जवळपास दोन हजार मतांची वाढ असल्याचा आरोपही आष्टा शहर विकास आघाडीच्या लोकांनी केला.
राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते तथा आमदार जयंत पाटील हे सांगली जिल्ह्यातील आष्टामध्ये पोहोचले व त्यांनी ईव्हीएम आणि मतदान आकडेवारी संदर्भात आढावा घेतला. यावेळी, आष्टा येथील मतदान प्रक्रियेनंतर ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवल्या आहेत, त्या स्ट्राँग रुममध्ये जाऊन पाटील यांनी पाहणी करत सुरक्षेसंदर्भात माहिती घेतली.
स्ट्राँग रुमबाहेर एलसीडीद्वारे प्रक्षेपण करावे
महाराष्ट्रातील सर्वच मतदान केंद्र आणि ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रुमच्या आतमध्ये आणि बाहेर दोन्ही ठिकाणी कॅमेरे लावावेत तसेच रुमच्या बाहेर एक मोठा डिस्प्ले एलसीडीच्या माध्यमातून उभारण्यात यावा, तो जनतेसमोर ठेवावा, अशी मागणी आमदार जयंत पाटील यांनी केली आहे.
आष्टा नगर परिषदेत निवडणूक प्रशासनाकडून रात्री देण्यात आलेल्या आकडेवारीमध्ये झालेले मतदान 22 हजार 864 इतके होते मात्र ऑनलाइन अपलोड झालेले मतदान 24 हजार 913 इतके होते. एकूण दोन हजार 49 मतदान वाढल्याचा आरोप आष्टा शहर विकास आघाडीकडून करण्यात आला व स्ट्राँग रुमबाहेर पदाधिकारी जमा झाले. मतदान वाढल्याचा आक्षेप घेत शरद पवार राष्ट्रवादी, उबाठा शिवसेना, शिंदे शिवसेना, अपक्ष उमेदवार स्ट्राँग रुमबाहेर जमा झाले.


