धूम स्टाईल चैन चोरट्यांना रावेर पोलिसांकडून अटक : दोन गुन्ह्यांची उकल


रावेर (4 डिसेंबर 2025) : रावेर गुन्हे शाखेच्या शोध पथकाने मोठ्या शिताफीने अट्टल चैन चोरट्यांना अटक केली असून त्यांनी रावेरात तसेच कुर्‍हा-काकोडा येथे गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींकडून सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

काय आहे नेमका प्रकार ?
1 डिसेंबर 2025 रोजी रावेर येथील शोभाबाई सुरेश पाटील (47, रा. वाघोड) या कर्जोद फाट्यावरून पायी घरी जात असताना लाल-काळ्या रंगाच्या बजाज पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्याजवळ थांबून पत्ता विचारला आणि संधी साधून त्यांच्या तोंडावर माती फेकली. महिलेला गोंधळात पाडून आरोपींनी त्यांच्या गळ्यातील सुमारे 10 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत बळजबरीने तोडून घेऊन पोबारा केला होता.



तांत्रिक माहितीद्वारे दोघांची पटली ओळख
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांनी तातडीने गुन्हे शोध पथकाला तपास सुरू करण्याचे निर्देश दिले. पथकाने घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये आरोपींचे चेहरे अस्पष्ट असले तरी, त्यांनी रावेर शहरात रेकी केल्यानंतर वाघोडच्या दिशेने प्रवास केल्याचा आणि त्यांच्या वाहनाचा तसेच शरीरयष्टीचा सुगावा लागला. तांत्रिक माहिती आणि गुप्तचर यंत्रणेच्या आधारे आरोपी अजय गजानन बेलदार (20) आणि नरेंद्र उर्फ निलेश अशोक बेलदार (20, दोघे रा.अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर) यांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले.

पोलिसांकडून चोरट्यांचा पाठलाग
पोलीस पथक आरोपींच्या अंतुर्ली गावापर्यंत पोहोचले आरोपी पसार झाल्यानंतर काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर आरोपी गावात परतल्याची माहिती मिळताच पोलिसांनी पाठलाग करून त्यांना नरवेल रोडवर पकडले. तपासात आरोपींनी कुर्‍हा-काकोडा (ता. मुक्ताईनगर) बस थांब्याजवळ 3 नोव्हेंबर रोजी केलेली 10 ग्रॅम सोनसाखळी चोरीची कबुली दिली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली 75 हजार रुपये किंमतीची पल्सर दुचाकी आणि एक लाख 75 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिन्यांसह एकूण अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
पोलसी अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल, पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, गुन्हे शोध पथकातील कल्पेश आगोदकर, विशाल पाटील, प्रमोद पाटील, सुकेश तडवी, विकार शेख, भुषण सपकाळे आणि सायबर सेलचे मिलिंद जाधव व गौरव पाटील यांनी आरोपींना अटक केली.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !