भुसावळात प्रभू दत्तात्रय अवतार दिनानिमित्त पालखी सोहळा

श्रीकृष्ण मंदिराची 12 वर्षाची परंपरा : श्रीमद्भगवद्गीता प्रवचन सप्ताहाचा समारोप


भुसावळ (6 डिसेंबर 2025) : शहरातील मुन्सीपल पार्कमधील श्रीकृष्ण मंदिरातर्फे गेल्या 12 वर्षापासून अखंडपणे श्रीदत्तात्रेय प्रभू अवतार दिनानिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. पालखी सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. 27 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या श्रीमद्भगवद्गीता प्रवचन सप्ताहाच्या समारोपानिमित्त शुक्रवारी हा सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी निघालेल्या पालखीत मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती होती. यावेळी भगवान दत्रात्रेय यांचा भाविक जयजयकार करीत होते.

पालखी सोहळ्याने वेधले लक्ष
शहरातील मुन्सीपल पार्कमधील श्रीकृष्ण मंदिरापासून प्रारंभ झालेली पालखी विठ्ठल मंदिर गल्ली, सराफ बाजार, गांधी चौक, लोखंडी पूल, वसंत टॉकीज मार्गे निघून पुन्हा श्रीकृष्ण मंदिरात पालखीचा समारोप झाला. पालखीच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. सोहळ्यात भडगाव येथील श्री चक्रधर भजनी मंडळाने भक्तिगीते सादर केली. ताल, लय आणि भावपूर्ण भजनांनी भक्तिमय वातावरण अधिक दुमदुमून गेले. पालखी दुपारी तीन वाजता निघाली होती. पालखीत महिला, पुरूष भाविक मोठ्या प्रमाणावर सामील झाले होते. महिला भक्तांकडून फुगडी, टाळ खेळून उत्साहात सामील झाले होते, शहरातील विविध चौकात पालखी सोहळ्यातील महिला भक्तांनी फुगडी, टाळ खेळत आनंद व्यक्त केला. पारंपरिक वेशभूषा, टाळ-मृदुंगाचे निनाद आणि ‘जय श्रीकृष्णच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. या सोहळ्याचे संयोजन वैशाली आराध्य यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. भाविकांच्या उपस्थितीमुळे पालखी सोहळा ऐतिहासिक आणि भक्तिमय वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.





भाविकांमध्ये उत्साह
मुन्सीपल पार्कमधील श्रीकृष्ण मंदिरात गेल्या 12 वर्षापासून दत्रात्रेय प्रभू याचा अवतार दिवसानिमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. पालखी सोहळ्यात टाळ, मृदुंग, भजनी मंडळ असते, यावेळी पालखी मध्ये दत्रात्रेय प्रभू यांची मुर्ती असते, या प्राचीन मुर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करीत असतात. दुपारी 3 वाजता निघालेली पालखीची मिरवणूक ही रात्री 8 वाजेपर्यत परत मंदिरात येत असते, प्रसाद घेऊन श्रीमद भगवतगीता प्रवचन सप्ताहाचा समारोप होतो, असे आराध्य प्रतिष्ठानच्या वैशाली आराध्य यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !