शीतलहरींमुळे दिवसाही गारवा : जॅकेटसह स्वेटर खरेदी वाढली
भुसावळ (10 डिसेंबर 2025) : शहरात सध्या थंडीचे आगमन झाले असून सायंकाळी व सकाळच्या सुमारास तापमानाचा पारा घसरत आहे. यामुळे नागरिकांनी ठेवणीतील उबदार कपडे वापरणे सुरू झाले आहे. अनेक नवनवीन डिझाइनच्या उबदार कपड्यांसह विविध फॅशनच्या मफलर व मखमली स्टॉल्सच्या खरेदीचा सध्या ट्रेण्ड दिसून येत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी विविध प्रकारच्या गरम कपड्यांच्या खरेदीसाठी शहरासह ग्रामीण भागातूनही ग्राहक येत आहेत. यामुळे शहरातील विविध भागात तात्पुरत्या स्वरूपात सुरु झालेल्या दुकानांमध्येही गर्दी दिसून येत आहे.
ऊबदार कपड्यांचा बाजार गरम
हिवाळा येताच उबदार कपड्यांचा बाजारही गरम होण्यास सुरुवात होते. थंडीमध्ये लहान मुले व ज्येष्ठांची जास्त काळजी घेतली जाते. अगदी पायाच्या नखापासून ते डोक्यापर्यंत लोकरीचे कपडे परिधान केले जातात. खासकरून विविध रंगसंगती असलेली वस्त्रे वापरण्याकडे महिलांचा कल वाढला आहे. शहरातील उत्तरेकडून येणार्या शितलहरींमुळे शहराचे किमान व कमाल तापमानाही घट होत आहे. गेल्या आठवडयाभराच्या तुलनेत शहराचे कमाल तापमानात सरासरी 4 अंशांनी घसरण झाली आहे.


दिवसाही वापरावे लागते स्वेटर
दिवसाच्या वेळी वाहणार्या शितलहरींमुळे तापमानात घसरण आली आहे. यामुळे आता नागरिकांना दिवसाच्या वेळीही स्वेटर व उबदार कपडे वापरावे लागत आहेत. थंडीत दररोज घट होत आहे. यामुळे शहरात अजून किमान चार दिवस तापमान 10 ते 13 अंशांच्या दरम्यान राहिल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान दिवसाचे तापमान घसरल्याने आता नागरिकांना दिवसाच्या वेळीही उबदार व गरम कपडे वापरावे लागत आहेत. वातावरण कोरडे झाले तरी शहरात शितलहरींमुळे गारवा कायम आहे.
यंदा थंडी उशिरापर्यंत
पावसाळा उशिरा संपल्यामुळे थंडी थोडीशी लांबली. मात्र, यंदा उशिरापर्यंत थंडीचा कडाका वाढायला सुरुवात झाली आहे. या ऋतूमध्ये प्रतिकारशक्तीचा कस लागत असल्याने स्वतःच्या संरक्षणासाठी उबदार कपडे घालणे फायदेशीर ठरते. त्यामुळे स्वेटर विक्रेत्यांसाठी हा सुगीचा काळ ठरतो. यंदा नववर्षाच्या सुरुवातीपासूनच कडाक्याची थंडी पडू लागल्यामुळे आता हउबदार कपड्यांना मागणी वाढत आहे.
या कपड्यांना मागणी
बाजारात सध्या जेष्ठ नागरिकांसाठी स्वेटर, मफलर, कानटोपी, कानपट्टी यांचा समावेश आहे. तरुण वर्गाला उबदार कपड्यांमध्ये फॅशनचा टचही हवा असल्याने स्वेट शर्ट्स, विंटर कोट, कॉटन जॅकेट्स, हुडीज, कानपट्टी या प्रकारांना तरुणाईची मोठी मागणी आहे. लहान मुलांसाठी हुडीज, कार्टुनचे चित्र असलेले, चेन असलेल्या स्वेटरला यंदा जास्त मागणी असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय महिलांमध्ये लोकरीच्या स्वेटरला पसंती आहे. तसेच शॉल, स्कार्फ यांनाही महिलावर्गाची मोठी मागणी आहे.
तरुणांकडून अधिक मागणी
शहर व ग्रामीण भागातील लोकांचा उबदार कपड्यांच्या खरेदीकडे कल आहे. नवनवीन उबदार कपडे बाजारात विक्रीसाठी आले आहेत. सध्या लोकांचा कल स्वेटर व जॅकेट खरेदीकडे अधिक आहे. उबदार कपडे, कान टोपी, फॅन्सी प्रकारातील कपडे व जॅकेट यांना तरुणांकडून अधिक मागणी असल्याचे विक्रेता रवी लुल्ला म्हणाले.







