चिरी-मिरी भ्रष्टाचाराला आळा : आता वाहतूक पोलिसांना बॉडी कॅमेरा
Stop rampant corruption: Now body cameras for traffic police नागपूर (10 डिसेंबर 2025) : वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहन चालकांवर कारवाई केली जाते मात्र बर्याचवेळी वरच्या-वर चिरीमिरी देवून वाहन सोडवले जाते अथवा कारवाईवेळी पोलिस कर्मचारी व अधिकारी आपल्या खासगी मोबाईल फोनचा वापर करतात मात्र हे सर्व प्रकार आता बंद होणार असून
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ई-चलन फाडणार्या वाहतूक पोलिसांना बॉडी कॅमेरा लावण्याची घोषणा केली आहे.


सर्वदूर राबवणार यंत्रणा
राज्यातील प्रमुख शहरांत टप्प्याटप्प्याने ही यंत्रणा राबवण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे वाहन चालकांकडून चिरी-मिरी घेण्याच्या प्रकारांना चाप बसेल शिवाय स्वतःचे उखळ पांढरे करणारे पोलिस व किरकोळ दंड भरून स्वतःची सुटका करवून घेणारे वाहन चालक या दोघांचीही अडचण होईल.
मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा
पोलिस कर्मचारी स्वतःच्या सोयीनुसार चलन अपलोड करतात. यातून वाहनचालकांची लूट होत असल्याचा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील शिंदे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे विधानपरिषदेत उपस्थित केला. त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहतूक पोलिसांना बॉडी कॅमेरा लावण्यात येणार असल्याचे स्पष्ट् केले.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
वाहतुकीचे नियम मोडल्यानतंर वाहन चालकावर कारवाई करताना वाहतूक पोलिसाकडे बॉडी कॅमेरा असणे आवश्यक असल्याचा नियम शेजारच्या गोव्यात करण्यात आला आहे. तिथे बॉडी कॅमेरा नसेल तर वाहतूक पोलिसांना ई-चलन फाडण्याची कारवाई करता येत नाही. महाराष्ट्रातही काही प्रमुख शहरांत टप्प्याटप्याने हाच नियम लागू करण्यात येणार आहे. ई चलनाची कारवाई करण्यात येत असताना अनेकदा वाहनचालक व वाहतूक पोलिसांत वाद होतात. पण बॉडी कॅमेरा असेल तर या प्रकारांना काहीअंशी आळा बसेल. विशेषतः भविष्यात असा एखादा वाद झाल्यास त्यावरही योग्य ती कारवाई करता येईल, असे मुख्यंमत्री म्हणाले.
ई-चलन केल्यानंतर त्याचा एसएमएस येण्यासाठी वेळ लागत होता. त्यावरही काम सुरू आहे. सिस्टिम अपडेट केल्यानंतर वाहन चालकांना तत्काळ एसएमएस येईल अशी सुविधा दिली जाईल तसेच ई चलन न भरणार्यांसाठी नियमावली तयार करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.







