अमित शहांनी हिंदुत्व शिकवू नये : उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल


Uddhav Thackeray attacks, saying Amit Shah should not teach about Hindutva. नागपूर (11 डिसेंबर 2025) : नागपूरात अधिवेशन सुरू असून त्यातून सर्वसामान्यांना काय मिळाले? असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूरात अधिवेशनानंतर उपस्थित केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मला हिंदूत्व शिकवू नये, असा पलटवार देखील यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी केला.

फडणविसांच्या ट्वीटला दिले उत्तर
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा एक व्हिडिओ ट्विट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.. कोण होतास तू काय झालास तू, असे ट्विट फडणवीस यांनी ठाकरेंना उद्देशून केले होते. यावर प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी त्यांना म्हणू इच्छितो की कोण होतास तू, काय झालास तू, भ्रष्टाचार्‍यांना पांघरुणात घेतलेस तू.. त्यांनी एक पांघरून मंत्री तयार करायला पाहिजे. पांघरून खाते तयार केले पाहिजे. एवढ्या भ्रष्टाचार्‍यांना त्यांनी जवळ घेतले आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.



हिंदूत्व शिकवण्याची गरज नाही
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिंदूत्वाच्या प्रश्नावरून उद्धव ठाकरेंना डिवचले होते. यावर बोलताना ठाकरे म्हणाले, अमित शहा यांनी मला हिंदूत्व शिकवण्याची गरज नाही. एखाद्या राष्ट्रांत राष्ट्रगीतावरून चर्चा होते. भाजपचे ‘वंदे मातरम’ हे ‘वन डे मातरम’ आहे. कारण त्यांना याची काही पडलेली नाही. भारतात काय सुरू आहे? वंदे मातरम म्हणताना त्यांना भारत माता किती दुःखात आहे हे त्यांना दिसत नाही.

अमित शहा मला जे हिंदूत्ववारून म्हणत आहेत, त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की त्यांच्या मंत्रिमंडळात गोमांस खाणारे माणसं आहेत. किरेन रिजीजू यांनी म्हटले होते की, मी गोमांस खातो. कोण मला अडवते आणि त्यांच्याच सोबत अमित शहा जेवण करताना बसले आहेत. माझ्या हिंदूत्वावर बोलण्या आधी त्यांनी किरेन रिजीजू यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले पाहिजे.

मी मुख्यमंत्री असताना पालघर साधू हत्याकांड झाले होते. त्या साधू हत्याकांडातील व्यक्तीला भाजपमध्ये घेताना तुमचं हिंदुत्व मेले होते का? लाज वाटली पाहिजे अमित शहांना, त्यांनी माझ्या हिंदुत्वावर शंका उपस्थित करताना, आपल्या बुडाखाली किती अंधार आहे ते पहिले बघायचे आणि मग माझ्यावर आरोप केले पाहिजेत. या न्यायमूर्तींवर ज्या काही गोष्टी आहेत, ती एका केसमुळे नाही, त्यांची जी काही वादग्रस्त वाटचाल आहे त्यावरून वाद आहे. मंदिरात दिवा लावला गेलाच पाहिजे याच विचारांचा मी आणि माझी शिवसेना आहे.

अधिवेशनात विदर्भासाठी काय दिले?
उद्धव ठाकरे म्हणाले, अधिवेशन हे आता अर्ध्यावर आले आहे. या अधिवेशनात विदर्भासाठी काय दिले यावर देखील चर्चा करणे गरजेचे आहे. हे वर्ष तसे बघायला गेले तर फार कठीण गेले महाराष्ट्राला,अतिवृष्टीचा फटका बसला, अनेक ठिकाणी शेत जमीन वाहून गेली आहे. मुख्यमंत्र्यांनी एक रक्कम घोषित केली, त्या पॅकेजचे पुढे काय झाले हे कोणालाच माहित नाही.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !