अंजली दमानियांचा गिरीश महाजनांवर हल्लाबोल ; म्हणाल्या राजकारणातून….
Anjali Damania attacks Girish Mahajan; says politics… नाशिक (12 डिसेंबर 2025) : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर वृक्षतोड प्रकरणावरून थेट निशणा साधला आहे. नाशिकमधील झाडे तोडण्याची गिरीश महाजन यांना इतकी मस्ती आली आहे की, लोकांनी आंदोलन केले तरी काही फरक पडत नाही, असे दमानिया यांनी कठोर शब्दात म्हटले आहे.
शहरातील चार मलनिस्सारण प्रकल्पांच्या विस्तारासाठी जवळपास साडेबाराशे झाडे तोडण्यात आल्याचे नाशिक महापालिकेने जाहीर केल्यानंतर पर्यावरणप्रेमींसह विविध सामाजिक संस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

महाजनांवर केली कणखर शब्दात टीका
अंजली दमानिया यांनी आपल्या वक्तव्यात सरकार आणि स्थानिक प्रशासनावर तीव्र टीका करताना गिरीश महाजन यांना थेट लक्ष्य केले. दमानिया यांनी नागरिकांना आवाहन करत अशा वृत्तीनं वागणार्या नेत्यांना राजकारणातून बाहेर फेका, अशी हाक दिली. त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली. पर्यावरणीय प्रश्नांवरून पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरले जात आहे. नाशिकच्या नागरिकांमध्येही या प्रकरणाबद्दल असंतोष मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.
458 झाडे वाचवण्यात यश
महापालिकेने सादर केलेल्या अहवालानुसार पंचक, चेहडी, आगार टाकळी आणि तपोवन येथील चार मलनिस्सारण प्रकल्पांच्या विस्तारासाठी एकूण एक हजार 728 झाडे तोडण्याचा प्रस्ताव होता. मात्र त्यातील 458 झाडे वाचविण्यात महापालिकेला यश आले असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. उर्वरित 270 झाडांची तोड करण्यात आली असून, या बदल्यात मनपाच्या मलनिस्सारण विभागाने एक कोटी 76 लाख रुपयांचा पर्यावरणीय भरपाई निधी जमा केला आहे. हा निधी पुढील पर्यावरण संवर्धन प्रकल्पांसाठी वापरण्यात येईल, असे मनपाने स्पष्ट केले.
फाशीच्या डोंगर परिसरात 17,680 झाडांची नव्याने लागवड केल्याचेही सांगण्यात आले असून, या रोपांमध्ये स्थानिक प्रजातींचा समावेश असल्याचा दावा मनपाच्या अधिकार्यांनी केला आहे.
राजमुद्री येथे जाऊन विशेष झाडांची निवड
नाशिकमधील परिस्थितीनंतर राज्य सरकारने शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्याची घोषणा केली. गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी दक्षिण भारतातील राजमुद्री येथे जाऊन विशेष झाडांची निवड केली होती. त्यानुसार जवळपास 15 फूट उंचीची 15 हजार देशी प्रजातींची झाडे ज्यात वड, पिंपळ, निंब, जांभूळ आणि आंबा यांसारख्या प्रजातींतील झाडे टप्प्याटप्प्याने नाशिकमध्ये दाखल होऊ लागली आहेत. पहिला ट्रक नुकताच शहरात दाखल झाला आहे.

