दोन हजारांची लाच मागणी भोवली : अमळनेर पालिकेचा कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
Demand for a bribe of two thousand rupees proved costly : An Amalner municipal employee caught in the ACB net अमळनेर (13 डिसेंबर 2025) : दोन हजारांच्या लाच मागणी प्रकरणत अमळनेर पालिकेतील शिपायाला जळगाव एसीबीने अटक केल्याने पालिका कर्मचार्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. आपल्याच कर्मचार्यास त्याच्या आश्वसित प्रगती योजनेचा हप्ता व वेतन निश्चितीसाठी दोन हजार रुपयांची लाच मागणी प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. मनोज साहेबराव निकुंभ असे अटकेतील कर्मचार्याचे नाव आहे.
असे आहे लाच प्रकरण
अमळनेर येथील पालिका कर्मचा-याच्या सुधारित आश्वसित योजनेचा दुसरा हप्ता तसेच वेतन निश्चिती झाली नव्हती त्यामुळे त्या कर्मचार्याने पालिकेतील आस्थापना विभागातील शिपाई मनोज निकुंभ या कर्मचार्याची भेट घेतली. मनोज निकुंभ याने तक्रारदार कर्मचार्याकडे दोन हजार रुपयांची मागणी करत मुख्याधिकार्यांकडून काम करून आणतो म्हटल्यानंतर तक्रारदार कर्मचार्याने 21 ऑक्टोबर 2024 रोजी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. एसीबीने सापळा रचला मात्र निकुंभने लाच स्वीकारली नाही मात्र लाच मागणी स्पष्ट झाल्यानंतर पोलिस अधीक्षकांकडे अहवाल पाठवण्यात आला व गुन्हा दाखल करण्याचे आदेश आल्यानंतर शुक्रवार, 12 रोजी कर्मचार्याला ताब्यात घेत त्याच्याविरोधात पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला जळगाव जिल्हा व सत्र न्या. एल. डी. गायकवाड यांच्या न्यायासनापुढे हजर केल्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.









