खडका येथे बालविवाह विरोधात शपथ
An oath against child marriage was taken at Khadka भुसावळ (13 डिसेंबर 2025) : जस्ट राईट फॉर चिल्ड्रन यांच्या संयुक्त विद्यमाने आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेरतर्फे शंभर दिवसीय बालविवाह मुक्त भारत अभियान राबवण्यात येत आहे. या अंतर्गत विविध उपक्रम राबवून जाणीव जागृती कार्यक्रम घेण्यात येत आहे. यामध्ये शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायत महिला व मुलींना बालविवाह विषयी माहिती देऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत बालविवाह प्रतिबंधक कायद्याविषयी मार्गदर्शन केले जात आहे. जळगाव जिल्ह्यातील बालविवाहाचे प्रमाण कमी कसे करता येईल, यासाठी प्रयत्न व उपयोजना व नियोजन करण्यात येत आहे.
खडका येथे जनजागृती
सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यासाठी सक्रिय आहेत. बालविवाहाच्या विरोधात काम करत आहेत. भुसावळ तालुक्यातील खडका येथे धर्मगुरू व गावातील नागरिक, महिला, मुले-मुलींना बालविवाह विषयी माहिती देऊन बालविवाह विरोधी शपथ घेण्यात आली. यावेळी गावात सरपंच यशोधरा देविदास तायडे, ग्रामसेवक कांचन बादशहा, पोलीस पाटील, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका माधुरी फेगडे यांनी सहभाग घेतला. आधार संस्थेचे अध्यक्ष डॉ.भारती पाटील, सहसंचालक रेणू प्रसाद, प्रकल्प समन्वयक आनंद पगारे, क्षेत्र समन्वयक सुनील हिवाळे, दीपाली हिवाळे यांनी परिश्रम घेतले.



