मालेगाव हत्याकांडावर सत्ताधारी आमदार संतप्त : सरकारला धारेवर धरत म्हणाले, राज्यात कायद्याचा धाक आहे की नाही ?
Ruling party MLAs are outraged over the Malegaon massacre : Criticizing the government, they asked, “Does the rule of law still prevail in the state or not?” नागपूर (13 डिसेंबर 2025) : मालेगाव तालुक्यातील तीन वर्षीय चिमुकलीची अत्याचारानंतर नराधमाने हत्या केली होती. या हत्येचा पडसाद नागपूर अधिवेशनात उमटले. सत्ताधारी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी आपल्याच सरकारला चांगलेच धारेवर धरत आम्हाला मालेगाव प्रकरणात उत्तर हवे आहे. मी स्वतः मुलीचा बाप आहे. येथील प्रत्येकजण मुलीचा बाप आहे. तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार व खून करून तिला झुडपात फेकून देण्यात आले. त्यानंतर आरोपी ताठ मानेने गावात पोलिसांसोबत फिरला. या राज्यात कायद्याची भीती राहिली की नाही? असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी केला.
सत्ताधारी आमदार संतप्त
आमदार सुहास कांदे यांनी शनिवारी लक्षवेधीद्वारे विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. यावेळी गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर उपस्थित नसल्याने ते चांगलेच संतापले. माझ्या लक्षवेधीला उत्तर देण्यासाठी इथे मंत्री महोदय कोण आहे? असा सवाल त्यांनी केला. त्यावर दुसरे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ग्रामीणचे गृहराज्यमंत्री वरच्या सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासाला गेल्यामुळे या प्रश्नाला आपण उत्तर देणार असल्याचे सांगितले.


आम्ही काय सातवी नापास आहोत का?
भाजप आमदार सुधीर मुनगंटीवर यांनी या चर्चेत हस्तक्षेप करत या गंभीर विषयावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उत्तर देतील असे सांगितले. त्यावर बावनकुळे म्हणाले, ही लक्षवेधी आपण उद्यासाठी राखून ठेवू. यामुळे सुहास कांदे चांगलेच संतापले. ते म्हणाले, मला गृहमंत्र्यांचे उत्तर हवे आहे. खात्याचे उत्तर हवे आहे. अध्यक्ष महाराज आम्ही काही सातवी नापास नाही. मला ग्रामीणच्या गृहमंत्र्यांकडून उत्तर हवे आहे. मी छगन भुजबळांना पाडून इथे आलो आहे. मी स्वतः मुलीचा बाप आहे. येथील प्रत्येक जण मुलींचा बाप आहे. आम्हाला मालेगाव प्रकरणात उत्तर हवे आहे.
सुहास कांदेंनी दिली प्रकरणाची सखोल माहिती
सुहास कांदे यांच्या या भूमिकेवर तालिका अध्यक्ष समीर कुणावर यांनी मंत्री आले की, आजच लक्षवेधी घेण्याची ग्वाही दिली. त्यानंतर गृहराज्यमंत्री पंकज भोयर सभागृहात दाखल झाले. यावेळी आपली लक्षवेधी मांडताना सुहास कांदे म्हणाले, 16 नोव्हेंबर 2025 रोजी मालेगावच्या डोंगराळे गावात शेखर उर्फ विजय खैरनार नामक नराधमाने तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून केला. खून केल्यानंतर तिला झाडाझुडपात फेकून दिले. ती बेपत्ता झाली म्हणून तिच्या पालकांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर हा नराधम पोलिसांसोबत त्या मुलीला शोधण्यासाठी फिरत होता.
आमदार सुहास कांदे म्हणाले की, नराधमाला जनतेच्या ताब्यात द्या. त्याचा मुडदा पडला पाहिजे. सरकारने या प्रकरणात एखादा चांगला वकील नेमला पाहिजे. ही केस फास्टट्रॅकवर चालवणार का? या प्रकरणात महिला न्यायाधीश असेल का? तीन वर्षीय मुलीला न्याय मिळेल का? नराधमाला फाशीची शिक्षा होईल का? या केसचा निकाल एका महिन्याच्या आत लागेल का? अशा विविध प्रश्नांची सरबत्तीही सुहास कांदे यांनी यावेळी केली.
दोषीवर कठोर कारवाईचे आश्वासन
पंकज भोयर यांनी प्रकरणाची माहिती देत पोलिस प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची दखल घेतल्याचे सांगून सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हा खटला जलदगती न्यायालयात वर्ग करण्यासाठी हायकोर्टाला विनंती करण्यात आली आहे. आपण कोर्टाला लवकरात लवकर दोषींवर कारवाई करण्याची विनंती करू शकतो, असे ते म्हणाले,







