भुसावळातील 14 हजार ग्राहकांकडे 17 कोटी थकीत : पोलिस बंदोबस्तात वीज जोडण्या होणार खंडित

थकबाकीदार, वीजचोरी प्रकरणात गुन्हे दाखल होणार


14,000 customers in Bhusawal owe 17 crore rupees: Electricity connections will be disconnected under police protection. भुसावळ (14 डिसेंबर 2025)  : शहर उपविभागात तब्बल 14 हजारांहून अधिक वीज ग्राहकांकडे 17 कोटी रुपयांपेक्षा अधिक वीजबिल थकीत आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरण कंपनीने कडक कारवाईचा निर्णय घेतला आहे. थकीत वीजबिल वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. गरज पडल्यास पोलिस बंदोबस्तात वीज जोडण्या खंडित करण्यात येणार आहेत.

थकबाकीदारांविरोधात तीव्र मोहिम
महावितरण कंपनीत ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस कर्मचार्‍यांची देखभाल-दुरुस्ती (मेंटेनन्स) आणि रेव्हेन्यू (बिलिंग अँड रिकव्हरी) अशा दोन स्वतंत्र विभागांमध्ये पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यानुसार मेंटेनन्स कर्मचारी केवळ देखभाल-दुरुस्तीची कामे करतील, तर रेव्हेन्यू विभागातील कर्मचारी फक्त वीजबिल वसुलीचे काम पाहतील. या पार्श्वभूमीवर थकबाकीदार ग्राहकांविरोधात मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.





पोलिस संरक्षणात होणार कारवाई
वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन थकीत बिल असलेल्या ग्राहकांच्या वीज जोडण्या तोडणार आहेत. अनेक ठिकाणी विरोध किंवा वाद होण्याची शक्यता लक्षात घेता ही कारवाई पोलिस संरक्षणात केली जाणार आहे. तसेच, ज्या ठिकाणी वीज चोरी आढळून येईल, त्या ग्राहकांविरुद्ध स्वतंत्रपणे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

14.18 कोटींची थकबाकी
महावितरणच्या आकडेवारीनुसार भुसावळ शहरात घरगुती ग्राहकांकडे सर्वाधिक म्हणजेच सुमारे 14.18 कोटी रुपयांची थकबाकी आहे. व्यावसायिक ग्राहकांकडे सुमारे 2.27 कोटी, औद्योगिक ग्राहकांकडे 23 लाखांहून अधिक, तर इतर श्रेणीतील ग्राहकांकडे सुमारे 36 लाख रुपयांची थकबाकी आहे.

दंड भरताच कनेक्शन होणार सुरू
वीज कंपनीतर्फे नोव्हेंबर महिन्यामध्ये 107 ग्राहकांचे कनेक्शन कट केले आहे तर 12 डिसेंबर पर्यंत 117 थकीत वीज ग्राहकांचे कनेक्शन कट केले आहे, थकबाकी पोटी कट केले कनेक्शन पुन्हा जोडणी करण्यासाठी वीज ग्राहकांना 320 रुपयांचा भुर्दंड लागणार आहे. 320 रुपयांचा भरणा केल्याशिवाय कट केलेले कनेक्शन पुन्हा जोडले जाणार नसल्याचे वीज कंपनीने सांगितले.

सहकार्य करावे अन्यथा कारवाई
महावितरणकडून सर्व वीज ग्राहकांना दर महिन्याला वीजबिल वेळेत भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा वीज जोडणी तात्पुरती खंडित होण्यासह कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन पाटील म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !