प्रेयसीचा दुसर्यावर जडला जीव ; संतप्त प्रियकराने प्रेयसीच्या नवर्यालाच संपवले
The girlfriend fell in love with someone else; the enraged boyfriend killed the girlfriend’s husband. जेजुरी (15 डिसेंबर 2025) : प्रेयसीने प्रियकराला सोडून दुसर्या गॅरेज व्यावसायीशी प्रेम विवाह केल्यानंतर संतप्त प्रियकराने कोयत्याचे वार करून प्रेयसीच्या नवर्यालाच संपवल्याचा धक्कादायक प्रकार पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथे घडला. दीपक गोरख जगताप (रा. राजेवाडी, ता.पुरंदर) असे मृताचे तर सुशांत संदीप मापारी (रा. माळशिरस ता. पुरंदर / मूळ रा. राहू ता. दौड जि. पुणे) असे पसार आरोपीचे नाव आहे.
असे आहे खून प्रकरण
पुरंदर तालुक्यातील राजेवाडी येथील मयत दीपक जगताप याचा नुकताच वाघापूर, ता.पुरंदर येथील पायल अमोल कांबळे हिच्याशी एक महिन्यापूर्वी प्रेमविवाह झाला. मयत दीपक जगताप हा उरुळी कांचनाल खाजगी गॅरेजमध्ये नोकरी करत होता. नोकरीच्या निमित्ताने लग्नानंतर सहा दिवसांनी तो पत्नीसह उरुळी कांचनला राहण्यास गेला. महिनाभर संसार सुरळीत चालू असताना, पायलचा पहिला प्रियकर सुशांत मापारी हा त्या दोघांच्या मोबाईलवर फोन आणि व्हॉट्सअॅप कॉल करून, मी पायलशी लग्न करणार होतो, तुम्ही दोघांनी लग्न का केले? असा राग मनात धरून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. याबाबत मयत दीपक ने आपल्या घरातही माहिती दिली होती.


भेटण्यास बोलावत केली हत्या
शनिवार, 13 डिसेंबरला, दीपक पायलसह राजेवाडी येथे आला. पायलला घरी सोडून घरी परतत असताना त्याला सुशांत मापारी सतत कॉल करत होता. ‘पायलचा मोबाईल माझ्याकडे आहे, तो घेऊन जा आणि लग्नाचा वाद मिटवून टाक’, असे सांगत राहिला. याच बहाण्याने सुशांत दीपकला भेटला. माळशिरस हद्दीतील रामकाठी शिवारात त्याने दीपकला बोलावून घेतले. याच ठिकाणी आरोपीने दीपकच्या डोक्यात, मानेवर, पायावर धारदार कोयत्याने वार करून त्याचा खून केला. त्यानंतर तो कोयता जागेवरच टाकून पसार झाला.
नातेवाईकांनी शोध घेतल्यावर प्रकरण उघडकीस
दीपक जगताप घरी न आल्याने आणि त्याचा मोबाईल बंद असल्याने नातेवाईकांनी शोध घेतला असता माळशिरस गावच्या रामकाठी शिवारात रक्तबंबाळ अवस्थेत दीपकचा मृतदेह आढळून आला. या ठिकाणी दीपक आणि आरोपी सुशांत या दोघांच्या दुचाकी आढळल्या. मयत दीपकचे मामा संतोष शेंडकर (रा. चांबळी ता. पुरंदर) यांनी जेजुरी पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. एपीआय दीपक वाकचौरे तपास करीत आहेत.







