भाजपा उमेदवाराच्या कार्यालयावर अज्ञातांचा गोळीबार
Unknown assailants opened fire on the BJP candidate’s office अंबरनाथ (17 डिसेंबर 2025) : महापालिका निवडणुकांचा निवडणूक कार्यक्रम सुरू होताच राजकीय रणधुमाळीला एकीकडे सुरूवात झाल्यानंतर दुसरीकडे मात्र अंबरनाथ शहरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मध्यरात्री गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. भरवस्तीत गोळीबार झाल्याने सामान्य नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तीन ते चार राउंड फायर
सीसीटीव्ही फुटेजनुसार, दुचाकीवरून आलेले दोन अज्ञात इसम अचानक कार्यालयासमोर थांबले आणि क्षणाचाही विलंब न करता कार्यालयाच्या दिशेने 3 ते 4 राऊंड फायर केले. गोळीबाराचा आवाज ऐकताच कार्यालयातील सुरक्षारक्षक बाहेर आला मात्र त्यालाही लक्ष्य करून हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्याचे समोर आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र सुरक्षारक्षक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या संपूर्ण घटनेचे दृश्य कार्यालयाबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यात स्पष्टपणे कैद झाले आहे.


भाजपा कार्यकर्ते संतप्त
निवडणूक प्रचार जोरात सुरू असताना उमेदवाराच्या कार्यालयावर झालेला हा हल्ला म्हणजे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने अंबरनाथ पोलिस ठाण्यात दाखल झाले. दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.
अंबरनाथ पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन
या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले असून भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. गोळीबार करणार्या संशयितांची नावे माहिती देऊनही त्यांच्यावर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नरेंद्र पवार यांच्यासह गुलाबराव करंजुळे आणि अनेक भाजप कार्यकर्त्यांनी अंबरनाथ पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले.







