कारमध्ये होरपळून सुरतच्या चालकाचा मृत्यू : शिरपूर तालुक्यातील घटना
A Driver from Surat died after being burnt alive in his car : The incident occurred in Shirpur Taluka शिरपूर (17 डिसेंबर 2025) : धावत्या कारने अचानकपणे पेट घेतल्याने सुरतच्या कार चालकाचा होरपळून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शिरपूर तालुक्यातील खामखेडा रस्त्यावर बुधवार, 17 डिसेंबर 2025 रोजी पहाटे साडे चार वाजेच्या सुमारास समोर आली. चंद्रकांत प्रताप धिवरे (40, रा.खामखेडा प्रथा, ता.शिरपूर, ह.मु.सुरत) असे मयत चालकाचे नाव आहे.
अचानक पेटली कार
समजलेल्या प्राथमिक माहितीनुसार, खामखेडा रस्त्यावर बुधवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास कार क्रमांक (जी.जे.06 जे.ओ.6325) द्वारे चंद्रकांत धीवरे हे जात असतांना रस्त्यावर कारने अचानक काही क्षणात पेट घेतला व पाहता-पाहता चालकाला कारमधून बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. आगीच्या तीव्रतेमुळे चालक गंभीररीत्या होरपळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

कार जळाल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह व पोलीस अधिकारी व अंमलदारांनी धाव घेतली मात्र मदतीपूर्वी कार पूर्णतः जळून खाक झाली. कारला आग कशामुळे लागली? याबाबत पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे.

