वाल्मिक कराडला मोठा धक्का : खंडपीठाने जामीन फेटाळला


Major setback for Valmik Karad:  The division bench rejected his bail application. छत्रपती संभाजीनगर (17 डिसेंबर 2025)  : मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला आहे. या निकालामुळे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. गावासह संपूर्ण परिसरात न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत होत आहे. या संवेदनशील प्रकरणाकडे राज्यभराचे लक्ष लागले होते.

आता कोठडीतच कराडचा मुक्काम
वाल्मिक कराडने औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर 12 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत सविस्तर सुनावणी झाली मात्र सरकारी पक्षाचा युक्तीवाद त्या दिवशी पूर्ण होऊ शकला नव्हता त्यामुळे न्यायालयाने पुढील सुनावणी 16 डिसेंबर रोजी ठेवली. त्यानंतर बुधवारी अंतिम निर्णय देत न्यायालयाने कराडचा जामीन अर्ज नामंजूर केला. ही सुनावणी न्यायमूर्ती सुशील एम.घोडेस्वार यांच्या न्यायालयात पार पडली.


संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी केज पोलिस ठाण्यात वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांविरोधात खून तसेच मकोका कायद्याअंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 31 डिसेंबर 2024 पासून वाल्मिक कराड कोठडीत आहे. दीर्घकाळ कोठडीत असल्याने आणि आपल्याला जामीन मिळावा यासाठी त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र या प्रकरणातील गुन्ह्याचे गांभीर्य आणि उपलब्ध पुरावे पाहता न्यायालयाने त्याला दिलासा देण्यास नकार दिला आहे.

हत्येच्या वेळी कराड शेकडो किलोमीटर दूर असल्याचा दावा
कराडच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ शिरीष गुप्ते यांनी जोरदार युक्तीवाद करताना सांगितले की, कराडला अटक करताना पोलिसांनी अटकेची कारणे लेखी स्वरूपात दिली नाहीत त्यामुळे ही अटक बेकायदेशीर ठरते तसेच या प्रकरणात मकोका कायदा चुकीच्या पद्धतीने लावण्यात आला. मकोका लागू करण्यासाठी दिलेली मंजुरीही नियमबाह्य असल्याचा युक्तीवाद करण्यात आला. याशिवाय, संतोष देशमुख यांच्या हत्येच्या वेळी वाल्मिक कराड घटनास्थळापासून शेकडो किलोमीटर दूर असल्याचा दावा करत त्याचा या गुन्ह्याशी कोणताही संबंध नसल्याचे सांगण्यात आले. कराडला खोट्या पद्धतीने गोवण्यात आले असून, त्याच्याविरोधात थेट पुरावे नसल्याचा मुद्दा उपस्थित करत जामीन देण्याची मागणी करण्यात आली.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !