नूतन वर्षात गुटखा विक्री करणार्यांवर मोक्कान्वये कारवाई : मंत्री नरहरी झिरवाळ
In the new year, action will be taken against those selling gutkha under the MCOCA act : Minister Narhari Zirwal मुंबई (17 डिसेंबर 2025) : राज्यात गुटख्याला बंदी असलीतरी यंत्रणेच्या छुप्या आशीर्वादाने सर्वदूर सहज गुटखा उपलब्ध होत आहे शिवाय शाळा व महाविद्यालयाच्या परिसरातही राजरोस गुटखा विक्री होत असल्याने आता अशा विक्रेत्यांवर मोक्कान्वये नव्या वर्षात कारवाई केली जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.
न्याय विभागाकडे प्रस्ताव
गुटखा उत्पादक व विक्रेत्यांवर मकोका लावण्यासाठीचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आला होता मात्र कायद्यातील तरतुदींनुसार हार्म आणि हर्ट या दोन्ही घटकांअभावी तो लागू होत नाही त्यामुळे या कायद्यात बदल करण्यात येऊन गुटखा व्यवसाय करणार्यांवरही मकोका लागू करता येईल, अशा आवश्यक दुरुस्त्या कायद्यात करण्यात येऊन हा कायदा अधिक कठोर करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती. त्यानुसार नागपूरचे हिवाळी अधिवेशन संपताच अन्न व औषध प्रशासन विभाग कामाला लागले आहे.

गुटखा उत्पादकांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष धोरण आणणार आहे, कायद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी दुरुस्ती प्रस्ताव आणण्यात येणार असल्याचेही मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.
गुटखाबंदी कायदा कठोर करण्यासाठी व मकोका लावण्यासाठी त्यात आवश्यक ते बदल करून सुधारित प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे लवकरात लवकर पाठविण्याचे निर्देश नरहरी झिरवाळ यांनी अधिकार्यांना दिले आहेत त्यामुळे आता राज्यातील अवैध गुटखा व्यवसायिकांचे धाबे दणाणले असून गुटखा विक्रीवर निश्चित त्याचा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.







