दहा हजारांची लाच भोवली : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकासह खाजगी चालक जळगाव एसीबीच्या जाळ्यात
भुसावळ (17 डिसेंबर 2025) : दारुबंदी कलमान्वये कारवाई न करण्यासाठी पहिल्या टप्प्यातील लाचेपोटी दहा हजार रुपये खाजगी पंटराच्या माध्यमातून स्वीकारताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक विजय भास्कर पाटील (51, ह.मु.खानापूर, ता.रावेर, मूळ रा.उर्हा, ता.मोताळा, जि.बुलढाणा) व खाजगी पंटर भास्कर रमेश चंदनकर (43, खानापूर, ता.रावेर) यांना जळगाव एसीबीने अटक केली. बुधवार, 17 रोजी रात्री उशिरा ही कारवाई खानापूर, ता.रावेर गावात करण्यात आल्यानंतर राज्य उत्पादनच्या लाचखोर अधिकार्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदाराच्या वडिलांवर यापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारूबंदी कायद्यान्वये कारवाई केली आहे व त्यानंतर दारूबंदी कायद्याच्या कलम 93 प्रमाणे कारवाई न करण्याच्या मोबदल्यात विजय पाटील यांनी तक्रारदाराकडे 12 हजारांची लाच मागितल्याने 17 डिसेंबर रोजी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. लाच पडताळणीत विजय पाटील व खाजगी इसम तथा चालक भास्कर चंदनकर यांनी कलम 93 अंतर्गत पुन्हा कारवाई न करण्यासाठी व दारुचा धंदा यापुढेही सुरू ठेवण्याच्या मोबदल्यात 1500 रुपयांप्रमाणे प्रति महिन्याप्रमाणे 12 महिन्यांचे 18 हजारांची मागणी केली व लाचेच्या पहिल्या हप्त्यापोटी दहा हजारांची लाच मागितली.

लाच स्वीकारताच लाचखोरांना अटक
खानापूर येथे पथकाने सापळा रचल्यानंतर खाजगी पंटर व चालक भास्कर चंदनकर यांच्याकडे लाचेची रक्कम देण्याचे पाटील यांनी सांगितल्यानंतर आधी पंटराला व नंतर अधिकार्याला एसीबीने अटक केली.
यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे डॅशिंग पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, नाईक बाळू मराठे, भूषण पाटील आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

