जामनेरच्या तरुणाचा खून : दोघा मित्रांनी जुन्या वादातून हत्या करीत मृतदेह टाकला धरणात


Jamner youth murdered: Two friends killed him over an old dispute and dumped the body in a dam जळगाव (19 डिसेंबर 2025) : जुना वाद डोक्यात ठेवून जवळच्या मित्रांनीच जामनेरच्या तरुणाचा खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी जळगावच्या एमआयडीसी पोलिसांनी दोघांना गुजरातमधून ताब्यात घेतले आहे. निलेश राजेंद्र कासार (27, दत्त चैतन्य नगर, जामनेर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

जंगलात आढळला होता मृतदेह
जामनेर शहरातील दत्त चैतन्य नगर येथील रहिवासी निलेश राजेंद्र कासार (27) हा तरुण 15 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेपासून अचानक बेपत्ता झाला होता. निलेशचा मोबाईलही बंद असल्याने नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. रामदेववाडी परिसरात त्याची दुचाकी मिळून आली. त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली.

गुजरातमधून दोघा मित्रांना घेतले ताब्यात
एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना काही संशयास्पद माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पथक पाठवून गुजरात राज्यातून भूषण बाळू पाटील आणि दिनेश चौधरी (महाजन) या दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी जुन्या किरकोळ वादातून निलेशची हत्या केल्याची कबुली दिली. आणि त्याला मारून पोत्यात भरून रामदेववाडी येथील नेव्हरे धरणाच्या पाण्यात टाकून दिल्याची कबुली दिली.

धरणाच्या पाण्यात सापडला मृतदेह
संशयित आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 19 डिसेंबर रोजी सकाळी एमआयडीसी पोलिसांनी शिरसोली ते रामदेववाडी दरम्यानच्या जंगलात शोधमोहीम राबवली. सकाळी 10 वाजेच्या सुमारास रामदेववाडी येथील घनदाट जंगलात तलावातील नेव्हरे धरणाच्या पाण्यातून निलेशचा मृतदेह मिळून आला. या घटनेमुळे जामनेर आणि जळगाव परिसरात शोककळा पसरली आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे व आता गुन्ह्यांच्या कलमात वाढ करण्यात येणार आहे.

यांची होती उपस्थिती
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल वाघ, एएसआय विजयसिंग पाटील, अधिकार पाटील, समाधान ठाकरे, गिरीश पाटील, कैलास पाटील, मंदार पाटील, सुभाष साबळे, शिरसोली प्र.न. पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी हे उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !