दहा हजारांचे लाच प्रकरण : रावेरच्या लाचखोर राज्य उत्पादन शुल्कच्या निरीक्षकासह चालकाला एका दिवसाची पोलिस कोठडी
घर झडतीत आढळले गावठी दारूचे आठ पाऊच
Ten thousand rupee bribery case : The corrupt State Excise Inspector from Raver and his driver have been remanded to one day of police custody भुसावळ (19 डिसेंबर 2025) : दहा हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटकेत असलेले रावेर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक विजय पाटील व खाजगी पंटर तथा चालक भास्कर रमेश चंदनकर (43, खानापूर, ता.रावेर) यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, एसीबीने खानापूर येथे पाटील यांच्या घराची झडती घेतल्यानंतर घरातून 200 एमएल क्षमतेचे गावठी दारूचे आठ पाऊच जप्त केले आहेत. ही दारू कारवाईदरम्यान जप्त करून कार्यालयात जमा करणे अपेक्षित असताना ती थेट घरात सापडल्याने संशय अधिक बळावला आहे.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदारावर कलम 93 अंतर्गत कारवाई टाळण्यासाठी दरमहा पंधराशे प्रमाणे एकूण 18 हजारांची लाच मागण्यात आली व लाचेच्या पहिल्या हप्ता म्हणून खाजगी पंटरामार्फत दहा हजारांची लाच स्वीकारताना बुधवार, 17 रोजी खानापूर, ता.रावेर येथे जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी दुय्यम निरीक्षक विजय पाटील व खाजगी पंटर भास्कर चंदनकर यांना रंगेहाथ अटक केली.

या प्रकरणात पुढील तपास सुरू असताना न्यायालयीन आदेशानुसार पाटील यांची पोलिस कोठडीत चौकशी केली जात आहे. एसीबीकडून करण्यात आलेल्या तपासात पाटील यांच्या घरात सापडलेले गावठी दारूचे पाऊच नेमके कुठून आले, ते जप्त करून कार्यालयात का जमा करण्यात आले नाहीत, याबाबत सखोल चौकशी केली जात आहे. या प्रकरणामुळे उत्पादन शुल्क विभागात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. तपास पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात सुरू आहे.

