चाळीसगाव गोळीबाराने हादरले : जुन्या वादातून तरुणावर गोळीबार

घटनास्थळी पोलिस व फॉरेन्सिक पथकाकडून तपासाला सुरूवात


Chalisgaon shaken by shooting: A young man shot in a dispute stemming from an old rivalry चाळीसगाव (19 डिसेंबर 2025) : चाळीसगाव शहरातील रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या परिसरात मध्यरात्री जुन्या वादातून 30 वर्षीय तरुणावर एकाने गोळीबार केल्याची घटना घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. गोळीबारात रोहिदास रामू कोळी (30, चाळीसगाव) हा तरुण जखमी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. गोळीबारानंतर संशयीत पसार झाला आहे.

मध्यरात्री गोळीबाराने खळबळ
चाळीसगाव रेल्वे स्थानकाजवळील परिसरात रोहिदास कोळी या तरुणावर एका संशयीताने गुन्हा दाखल केल्याचा राग मनात ठेवून एक गोळी झाडली व ही गोळी रोहिदासच्या मांडीला लागल्याने मोठा रक्तस्त्राव झाला व जखमीला तातडीने चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. गोळीबारानंतर संशयीत मात्र आपल्या साथीदारासह पसार झाल्याचे सूत्रांनी सांगितले. जून महिन्यात रोहिदासने संशयीताविरोधात भादंवि 324 चा अर्थात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला होता व हा राग मनात असल्याने संशयीताने रोहित समोर दिसताच पुन्हा वाद उकरून काढत गोळी झाडल्याचे सांगण्यात आले.

गोळीबारानंतर चाळीसगाव शहर निरीक्षक अमित मनेल यांच्यासह फॉरेन्सिक पथकाने धाव घेतली. गोळीबार करणार्‍या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून जखमींकडूनही माहिती घेण्यात येत आहे. शहरात झालेल्या गोळीबारानंतर मात्र मोठी खळबळ उडाली आहे. पसार संशयीताचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था धोक्यात!
जळगाव जिल्ह्यात सातत्याने गोळीबार, चोर्‍या, घरफोड्यांचे प्रमाण वाढल्याने कायदा-सुव्यवस्था धोक्यात आल्याची भीती व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वीच पानटपरीवर लुटीच्या उद्देशाने आलेल्या चौघांपैकी एकाने प्रतिकार करणार्‍या 39 वर्षीय प्रौढावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना भुसावळातील जळगाव रोडवरील स्व.नारायण पाटील व्यापारी संकुलाजवळ बुधवारी रात्री उशिरा घडली होती. आरोपींच्या गोळीबारात उल्हास पाटील (39, जुना सातारा, भुसावळ) हे जखमी झाले होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !