जातपडताळणीच्या दाखल्यासाठी तीन लाखांची लाच मागणी भोवली : धुळ्यातील शिक्षक एसीबीच्या जाळ्यात


गणेश वाघ
Demanding a bribe of three lakhs for a caste verification certificate backfired : A teacher from Dhule caught in the ACB’s net भुसावळ (19 डिसेंबर 2025) : जात पडताळणीचा दाखला देण्यासाठी तीन लाखांची लाच मागणी केल्याप्रकरणी धुळ्यातील न्यू सिटी हायस्कूलचे शिक्षक व सिनेट सदस्य नितीन लिलाधर ठाकूर (रा.देवपूर, धुळे) यांना धुळे एसीबीने अटक केली आहे. या कारवाईने धुळ्यातील शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, खाजगी शिक्षकाला लाच प्रकरणात अटक झाल्यानंतर आता अनुसूचित जमाती जात पडताळणी कार्यालयातील कुणा-कुणाचा या प्रकरणात सहभाग आहे? याबाबत एसीबीकडून खोलवर तपास सुरू असून लवकरच मोठी कारवाई होण्याची दाट शक्यता खास सूत्रांनी वर्तवली जात आहे.

असे आहे लाच प्रकरण
तक्रारदाराने अनुसूचित जमाती प्रवर्गाचा दाखला मिळण्यासाठी अनुसूचित जमाती जात पडताळणी कार्यालयात अर्ज केला मात्र तीन वर्ष उलटूनदेखील जातीचा दाखला मिळाला नाही त्यामुळे तक्रारदार तरुणीच्या मालेगाव येथे राहणार्‍या भावाने संबंधित कार्यालयात भेट दिली. त्यावेळी याच कार्यालयातील एका लिपिकाने शिक्षक नितीन ठाकूर यांच्याशी संपर्क साधा, असे सांगितले. त्यानुसार संबंधित तरुणाने ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या दाखल्यासाठी सुमारे दोन ते अडीच लाख रुपये लागतील, असे सांगितले.

1 ऑगस्ट 2025 रोजी लाच मागणीचा हा प्रकार घडला होता त्यामुळे या तरुणाने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला मात्र संशय आल्याने लाच स्वीकारण्यात आली नाही मात्र एसीबीला लाच मागणीचा अहवाल आल्यानंतर गुरुवार, 18 रोजी एसीबीने ठाकूर यांना ताब्यात घेतले व त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. देवपूरातील दोंदे कॉलनीतील घराची पथकाने झडतीदेखील घेतली.

पडद्यामागील अनेक बड्या मोहर्‍यांवर कारवाईची शक्यता
शिक्षक ठाकूर यांना लाच मागणी प्रकरणी अटक झाल्यानंतर त्यांचा अनुसूचित जमाती जात पडताळणी कार्यालयातील नेमक्या कुणा-कुणाशी संवाद झाला वा संभाषण झाले आहे? तसेच या साखळीतील पडद्यामागे कोण-कोण सहभागी आहेत त्यांना शोधून पुढील कारवाईचे आव्हान धुळे एसीबीपुढे उभे राहिले आहे. लवकरच या प्रकरणात मोठी कारवाई होण्याची एसीबीच्या सूत्रांनी वर्तवली जात आहे. अधिक तपास एसीबीचे डॅशिंग पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे व सहकारी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !