चिंता वाढविण्याऐवजी स्वत:चे निरीक्षण करायला शिका, यश नक्कीच मिळेल : समुपदेशक निलेश गोरे
भुसावळ (20 डिसेंबर 2025) :आयुष्यात कोणतीही परीक्षा आली की ताणतणाव येतो. चिंता वाढते आणि चिंता वाढली की हाताला घाम येणे, पाठांतर केलेले न आठवणे, मन अस्वस्थ व अस्थिर होणे, हृदयाची धडधड वाढणे अशी शारीरिक व मानसिक लक्षणं दिसतात. अशावेळी स्वतःचे निरीक्षण करायला शिका. स्वविषयी प्रत्येकाला जाणीव होणे गरजेचे असते, असे मत समुपदेशक नीलेश गोरे यांनी मांडले.
श्री जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघाकडून सामाजिक उपक्रमांतर्गत बोर्डाच्या परीक्षेचे औचित्य साधून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेला सामोरे जाताना या विषयावर समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थान डॉ.सुधा खराटे यांनी भूषविले. यावेळी बोलताना गोरे म्हणाले की, चिंता चार प्रकारची असते. कामगिरी बाबतची चिंता, आगामी घटनांविषयीची चिंता, परीक्षेची चिंता व अपयशाविषयीची चिंता. कोणत्याही प्रकारच्या चिंतेतून नैराश्य जन्माला येत असते. यासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे असते.




सूत्रसंचालन विद्या रामवंशी यांनी तर आभार मिना पाटील यांनी मानले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी कोषाध्यक्ष डी. एस. पाटील, उपाध्यक्ष नारायण वडदकर, डॉ. सुधीर कापडे, शालिग्राम पाचपांडे, कुसुम पाटील, वामन पाटील यांनी सहकार्य केले.
चिंता घालविण्यासाठी उपाय
चिंता घालविण्यासाठी ब्रेन रिदम मॅपिंग, स्मॉल व्हिक्टोरि लूप्स व पावर व्हिजुलायझेशन तंत्र प्रभावशाली उपाय आहेत. मेंदूतील लय आपल्या शारीरिक मानसिक अवस्थेचे प्रतिबिंब असते .ध्यान, योग प्राणायाम केल्याने मेंदूतील लयी संतुलित राहतात .लहान लहान यशाचे चक्र जीवनात निर्माण करा. कल्पना शक्तीचा वापर करून संभाजीराजे यांनी 124 वेळा युद्ध जिंकले तसेच जगभरातील सर्व खेळाडू या शक्तीचा वापर करून यशस्वी होतात, असेही गोरे यांनी सांगितले.
जीवनात असे व्हा यशस्वी
कल्पनाशक्ती ही मानवाला परमेश्वराकडून मिळालेले खूप मोठे वरदान आहे. मन स्थिर करून काम केल्याने आत्मविश्वास वाढतो. परीक्षेचा कोणताही ताण न घेता जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्हा अशा शुभेच्छा देऊन त्यांनी चिंता कमी करणारे तंत्र विद्यार्थ्यांकडून करवून घेतले. या प्रसंगी माधवी राठोड व भावार्थ शिशीर जावळे या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे कार्यशाळेविषयी प्रतिक्रिया दिली.
लक्ष केंद्रीत करा : खराटे
आपल्या मनात येणार्या विचारांवर लक्ष केंद्रित करा. जसे विचार कराल तसे जीवनात घडत असते.अंतर्मनात ज्या विचारांची पेरणी करणार तसेच घडणार. प्रत्येक गोष्टीची निर्मिती दोन वेळा होते प्रथम आपल्या मनात नंतर प्रत्यक्ष दृश्य स्वरूपात. कल्पना तंत्राने निश्चितच जीवनामध्ये ध्येयपूर्ती करता येते, असे मत अध्यक्षीय मनोगतात सुधा खराटे यांनी मांडले.
100 विद्यार्थ्यांचा सहभाग
कार्यशाळेमध्ये भुसावळ मधील महाराणा प्रताप विद्यालय, अहिल्यादेवी कन्या विद्यालय, बर्हाटे विद्यालय, संत गाडगेबाबा विद्यालय , ताप्ती पब्लिक स्कूल , दादासाहेब आर जी झांबरे विद्यालय भुसावळ,सेंट अलायसिस स्कूल, के नारखेडे विद्यालय,डॉक्टर उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल या शाळांमधील एकूण 100 विद्यार्थी सहभागी झाले होते.