अभ्यासातील चुका टाळा, भीतीवर मात करा, आत्मविश्वास वाढवा : समुपदेशक आरती चौधरी
भुसावळ (20 डिसेंबर 2025) : अभ्यासातील सामान्य चुका ओळखून त्या टाळणे, परीक्षेची भीती दूर करून आत्मविश्वास वाढवणे आणि अभ्यासात गोडी निर्माण करणे, परीक्षा म्हणजे संधी, सकारात्मक विचार, योग्य अभ्यासपद्धती संतुलित दिनचर्येचा विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला के.नारखेडे विद्यालयात समुपदेशक आरती चौधरी यांनी मार्गदर्शक करतांना दिला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आयोजित या समुपदेशनातून विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे सकारात्मक दृष्टिकोन मिळावा यासाठी शाळेतर्फे व्याख्यानाचे आयोजन केले होते.
भीतीमुळे आत्मविश्वास होतो कमी
या कार्यक्रमात मुख्याध्यापिका संगीता अडकमोल यांच्या हस्ते आरती चौधरी यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. व्याख्यानात त्यांनी अभ्यास करताना होणार्या वेळेचे अयोग्य नियोजन, लक्ष केंद्रीत न होणे, पाठांतरावर अति अवलंबून राहणे अशा सामान्य चुका विद्यार्थ्यांना सोप्या उदाहरणांद्वारे समजावून सांगितल्या. योग्य अभ्यासपद्धती, नियमित सराव आणि समजून अभ्यास करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारी भीती हा मुद्दा त्यांनी अत्यंत कौशल्याने हाताळला. भीतीमुळे आत्मविश्वास कमी होतो, असे सांगत सकारात्मक विचार, योग्य झोप, संतुलित दिनचर्या आणि आत्मविश्वास वाढवणार्या सवयी अंगीकारण्याचा सल्ला त्यांनी दिला. परीक्षेकडे भीतीऐवजी एक संधी म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन विकसित करण्याचे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांशी संवादात्मक पद्धतीने प्रश्नोत्तरांचा समावेश असल्याने कार्यक्रम अधिक रंजक ठरला. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या शंका, समस्या व अनुभवांवर आरती चौधरी यांनी समर्पक मार्गदर्शन करत त्यांचे निरसन केले.





या व्याख्यानामुळे अभ्यासाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाल्याची व आत्मविश्वास वाढल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. पर्यवेक्षक एस.पी.पाठक यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शैलेंद्र वासकर,शैलेंद्र महाजन,संदीप पाटील,व्ही.एस.राणे, निळकंठ खाचणे, नवीन नेमाडे यांनी परिश्रम घेतले.