भाजपाला धक्का : पाचोर्‍यात शिंदे गटाला एक हाती सत्ता : आमदार किशोर पाटील किंगमेकर


पाचोरा (21 डिसेंबर 2025) : पाचोरा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने एकहाती सत्ता मिळवली असून भाजपाचे गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण यांचा प्रभाव येथे चालला नसल्याचे दिसून आले आहे. मतमोजणी पूर्ण होताच बहुतांश प्रभागांमध्ये शिंदेगटाच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवत नगरपालिकेवर आपली मजबूत पकड निर्माण केली आहे.

प्रभाग क्रमांक 1 मध्ये अ आणि ब या दोन्ही जागांवर शिवसेना शिंदे गटाने विजय मिळवला आहे. प्रभाग 1 अ मधून मनिषा सुरेंद्र बाविस्कर यांनी तर प्रभाग 1 ब मधून किशोर गुणवंत बारावकर यांनी विजय संपादन करत शिंदे गटाची विजयी सुरुवात केली. या प्रभागात मतदारांनी स्पष्टपणे सत्ताधारी गटावर विश्वास दाखवला.

प्रभाग क्रमांक 2 मध्येही शिवसेना शिंदे गटाचा प्रभाव कायम राहिला असून, 2 अ मधून संजय नाथालाल गोहिल आणि 2 ब मधून वैशाली छोटुलाल चौधरी यांनी विजय मिळवला आहे. या प्रभागात विकासकामे आणि स्थिर नेतृत्व हे निर्णायक मुद्दे ठरल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

प्रभाग क्रमांक 3 अ गटातून भारतीय जनता पक्षाच्या कविता विनोद पाटील यांनी विजय मिळवत भाजपचे खाते उघडले, तर ब गटातून शिवसेना शिंदेगटचे सतीश पुंडलिक चेडे यांनी बाजी मारली. या प्रभागात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली.

प्रभाग क्रमांक 4 मध्ये शिवसेना शिंदेगटने पुन्हा आपली ताकद सिद्ध केली असून, 4-अ मधून रफिक गफ्फार बागवान आणि 4-ब मधून शेख रशीदाबी शब्बीर यांनी विजय मिळवला आहे. या प्रभागातील निकालाने शिंदेगटची पकड अधिक मजबूत झाली आहे.

प्रभाग क्रमांक 5 मध्येही शिवसेना शिंदेगटचा झेंडा फडकला असून, 5-अ मधून खनसा सलीम बागवान आणि 5-ब मधून संजय त्र्यंबक चौधरी यांनी विजयी होत मतदारांचा विश्वास संपादन केला आहे. अल्पसंख्याक आणि सर्वसामान्य मतदारांचा पाठिंबा या विजयात महत्त्वाचा ठरला.

प्रभाग क्रमांक 6 मध्ये अ आणि ब दोन्ही जागांवर शिवसेना शिंदेगटचे उमेदवार विजयी झाले आहेत. 6-अ मधून रहेमान बिस्मिल्ला तडवी आणि 6-ब मधून प्रांजल सुमित सावंत यांनी स्पष्ट मताधिक्याने विजय मिळवला असून, या प्रभागातही शिंदेगटचा दबदबा कायम राहिला आहे.

या निकालांमुळे पाचोरा नगरपालिकेवर शिवसेना शिंदे गटाचे संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित झाले असून, आगामी काळात नगरपालिकेच्या कारभारात सत्ताधारी गटाला निर्णय घेणे अधिक सोपे जाणार आहे. मतदारांनी दिलेला कौल हा विकासाभिमुख प्रशासन आणि स्थिर नेतृत्वाच्या अपेक्षांचे प्रतीक मानला जात आहे.

एकंदरीत, पाचोरा नगरपालिका निवडणूक 2025 मध्ये शिवसेना शिंदे गटाने बहुसंख्य प्रभागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !