धरणगावात पालकमंत्र्यांना जबर धक्का : शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार विजयी
धरणगाव (21 डिसेंबर 2025) : धरणगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाला जबरदस्त धक्का बसला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) च्या उमेदवार लिलाबाई सुरेश चौधरी यांनी स्पष्ट बहुमतासह दणदणीत विजय मिळवला महायुतीकडून वैशाली भावे यांचा पराभव झाला.
मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच लिलाबाई चौधरी यांनी आघाडी घेतल्याने निवडणूक एकतर्फी होत गेली. अखेर महायुतीच्या उमेदवार वैशाली भावे यांचा दारुण पराभव झाला.

धरणगाव हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा प्रभाव क्षेत्र मानला जात असताना, त्यांनी स्वतः प्रचारात लक्ष घालूनही अपेक्षित यश न मिळाल्याने हा निकाल त्यांच्या नेतृत्वासाठी मोठा राजकीय धक्का समजला जात आहे. या पराभवामुळे स्थानिक राजकारणातील सत्ता समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निकाल जाहीर होताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शहरात जल्लोष केला. फटाके फोडत आणि घोषणा देत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
विजय हा जनतेने विकासाच्या मुद्यावर दिलेला विश्वास असल्याचे सांगत नवनिर्वाचित नगराध्यक्ष लिलाबाई चौधरी यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षभेद न ठेवता काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. या विजयामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकारणात ठाकरे गटाचे मनोबल उंचावले असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निकाल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
