भुसावळात मंत्र्यांना धक्का : मुक्ताईनगरसह पाचोरा व चाळीसगावात आमदारांची चालली जादू : जळगाव जिल्ह्यातील पालिकांचा निकाल वाचा एका क्लिकवर


गणेश वाघ
Ministers suffer a setback in Bhusawal: The MLAs’ influence prevails in Muktainagar, Pachora and Chalisgaon: Read the results of the municipal elections in Jalgaon district with a single click. भुसावळ (21 डिसेंबर 2025) : 18 पालिकांचा निकाल रविवारी जाहीर झाला असून अनेक ठिकाणी भाजपाला यश मिळाले आहे. भुसावळात मंत्री संजय सावकारे यांना मोठा धक्का बसला असून त्यांच्या सौभाग्यवती रजनी सावकारे येथे पराभूत झाल्या आहेत तर मुक्ताईनगरात आमदार कन्या संजना पाटील, पाचोर्‍यात आमदार किशोर पाटील यांच्या सौभाग्यवती तसेच चाळीसगावात आमदार मंगेश चव्हाण यांच्या सौभाग्यवती प्रतिभा चव्हाण नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. यावल मतदारसंघात आमदार अमोल जावळे यांच्या नेतृत्वात सावदा, फैजपूर व रावेर पालिकेत भाजपाचे कमळ उमलले.

वरणगावात भाजपा बंडखोर सुनील काळे नगराध्यक्षपदी
राज्यात अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या वरणगाव पालिकेच्या निवडणुकीत भाजपा व राष्ट्रवादीला वरणगावकरांनी नाकारत अपक्ष उमेदवार सुनील काळे यांना निवडून दिले. मंत्री रक्षा खडसे, मंत्री संजय सावकारे, माजी मंत्री एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली असलीतरी जनतेने साफपणे त्यांना स्पष्टपणे नाकारल्याचे या निवडणुकीत दिसून आले. विकासाच्या ट्रॅक्टरला जनतेने कौल दिल्याने काळे समर्थकांनी शहरात फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. भाजपाच्या उमेदवार शामल अतुल झांबरे यांना पाच हजार 686 मते मिळाली तर प्रतिस्पर्धी भाजपाचे बंडखोर व अपक्ष उमेदवार सुनील रमेश काळे यांना सहा हजार 468 मते मिळाली व 782 मतांनी सुनील काळे येथे नगराध्यक्षपदी निवडून आले.

फैजपूर नगराध्यक्षपदी दामिनी सराफ
फैजपूर येथे नगराध्यक्षपदासाठी भाजपाने दामिनी पवन सराफ यांना संधी देण्यात आली. निवडणुकीआधीच काँग्रेसचे उमेदवाराने अर्ज मागे घेऊन भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. यानंतर दामिनी सराफ यांनी धडाक्यात प्रचार सुरू केल्यानंतर जनतेने त्यांच्या बाजूने कौल देत नगराध्यक्षपदी विराजमान केले.

सावदा नगराध्यक्षपदी भाजपाच्या रेणुका पाटील
सावदा नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी भाजपाच्या रेणुका राजेंद्र पाटील विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुभद्राबाई सिद्धार्थ बडगे यांचा 173 मतांनी पराभूत केले.

रावेर नगराध्यक्षपदी भाजपाच्या संगीता महाजन
रावेरात भाजपाच्या संगीता भास्कर महाजन या नगराध्यक्षपदी निवडून आल्या असून येथे भाजपाचे नऊ नगरसेवक निवडून आले आहेत.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची एक तर अजित पवार गटाचे 10 तर काँग्रेस व अपक्षांच्या प्रत्येकी दोन जागा येथे निवडून आल्या.

भुसावळात राष्ट्रवादीच्या उमेदवार नगराध्यक्षपदी
भुसावळ नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार गायत्री चेतन भंगाळे विजयी झाल्या असून त्यांना 42 हजार 234 मते मिळाली आहेत तर प्रतिस्पर्धी भाजपाच्या उमेदवार रजनी संजय सावकारे यांना 40 हजार 387 मते मिळाली. एक हजार 847 मतांनी गायत्री भंगाळे-गौर विजयी झाल्या आहेत.

अमळनेरात शिंदे गटाचे उमेदवार विजयी
अमळनेर पालिकेत शिवसेना शिंदे गटाचे डॉ. परीक्षित बाविस्कर विजयी झाले असून राष्ट्रवादी अजित पवार गट व भाजप (शहर विकास आघाडी) चे जितेंद्र ठाकूर यांचा पराभव झाला आहे. अमळनेरमध्ये राष्ट्रवादीचा अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.

पारोळा नगराध्यक्षपदी शिंदेसेनेचे चंद्रकांत पाटील
पारोळा नगराध्यक्षपदी शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार चंद्रकांत भिकनराव पाटील हे 18 हजार 186 मते मिळवत विजयी झाले असून त्यांनी 9 हजार 486 मतानीं प्रतिस्पर्धी जनाधार विकास पार्टीच्या अंजली करण पाटील (8700) यांचा पराभव केला.

पाचोर्‍यात शिंदे गटाची सरशी
पाचोरा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना शिंदेगटाने दणदणीत यश मिळवत नगरपालिकेवर आपले प्रचंड वर्चस्व स्थापित केले आहे. नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या थेट निवडणुकीत शिवसेना शिंदेगटाच्या उमेदवार तथा आमदारांच्या सौभाग्यवती सुनीता किशोर पाटील यांनी 11 हजार 348 मतांनी विजय मिळवला आहे.

यावलला उबाठाच्या छाया अतुल पाटील विजयी
यावल नगरपालिकेसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत मतदारांनी भाजपाला नाकारत नगराध्यक्षपदासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार छाया अतुल पाटील यांना विजयी केले. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रोहिणी उमाकांत फेगडे यांचा सुमारे पाच हजारांहून अधिक मतांनी येथे पराभव झाला. आमदार अमोल जावळे यांचा प्रभावही येथे फिका पडल्याचे या निवडणुकीत दिसून आले.

धरणगाव उबाठा गटाचा उमेदवार विजयी
धरणगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाला जबरदस्त धक्का बसल्याचे पहायला मिळाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) च्या उमेदवार लिलाबाई सुरेश चौधरी यांनी स्पष्ट बहुमतासह दणदणीत विजय मिळवला महायुतीच्या उमेदवार वैशाली भावे यांचा पराभव झाला. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच लिलाबाई चौधरी यांनी आघाडी घेतल्याने निवडणूक एकतर्फी होत गेली.

चाळीसगावात मंगेश पर्व : प्रतिभा चव्हाण विजयी
चाळीसगावात आमदार मंगेश चव्हाण यांच्या सौभाग्यवती प्रतिभा चव्हाण या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या असून महाविकास आघाडीच्या उमेदवार माजी नगराध्यक्षा पद्मजा राजीव देशमुख यांचा येथे पराभव झाला आहे. आमदार मंगेश चव्हाण यांचा प्रभाव येथेही दिसून आला आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !