चाळीसगावात आमदार मंगेश चव्हाण किंगमेकर : नगराध्यक्षपदी प्रतिभा चव्हाण विजयी


In Chalisgaon, MLA Mangesh Chavan is the kingmaker: Pratibha Chavan wins the mayoral election चाळीसगाव (21 डिसेंबर 2025) : पालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदावर आमदार मंगेश चव्हाण यांच्या सौभाग्यवती प्रतिभा चव्हाण यांनी विजय मिळवल्यानंतर भाजपा समर्थकांनी जोरदार जल्लोष केला. या निवडणुकीत आमदार चव्हाण यांची मतदारसंघावरील आपली पकड घट्ट असल्याचे स्पष्ट झाले आहे. चाळीसगाव चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात यंदा मोठी चुरस होती. चाळीसगावचे माजी आमदार राजीवदादा देशमुख यांचे अकस्मात निधन झाल्याने राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असतांनाच नगरपालिका निवडणुकीची घोषणा झाली होती.

भाजपा उमेदवार विजयी
पालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार मंगेश चव्हाण यांच्या सौभाग्यवती प्रतिभा चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली तर महाविकास आघाडीच्या वतीने शहरविकास आघाडीच्या माध्यमातून माजी नगराध्यक्षा पद्मजा राजीव देशमुख यांना उमेदवारीच्या रिंगणात उतरवण्यात आले. याआधी 2019 साली मंगेश चव्हाण आणि राजीव देशमुख यांच्यात आमदारकीची लढत झाली होती. यानंतर सहा वर्षांनी दोघांच्या सौभाग्यवती लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकमेकांच्या समोर उभ्या ठाकल्या. अर्थात, पुन्हा एकदा चाळीसगावात चव्हाण विरूध्द देशमुख असा सामना रंगल्याने येथील निवडणूक ही लक्षवेधी ठरली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराची धुरा आमदार मंगेश चव्हाण यांनी सांभाळली तर शहर विकास आघाडीची सूत्रे माजी आमदार तथा खासदार उन्मेष पाटील यांच्याकडे होती.

आमदारांनी पाचोर्‍यात ठोकले षड्डू
निवडणुकीची लक्षणीय बाब म्हणजे आमदार मंगेश चव्हाण यांनी पाचोरा येथे जाऊन आमदार किशोरआप्पा पाटील तर पारोळ्यात माजी आमदार सतीशअण्णा पाटील यांना आव्हान दिले त्यामुळे या दोन्ही मान्यवरांनी आपापल्या पक्षांची भूमिका सोडून पद्मजाताई देशमुख यांच्या प्रचारासाठी चाळीसगावात सभा घेतल्या. याला भाजपतर्फे प्रत्युत्तर देण्यात आले. अर्थात, दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप करण्यात आल्याने निवडणुकीच्या काळात येथील वातावरण मोठ्या प्रमाणात तापल्याचे दिसून आले.

रविवारी मतमोजणी सुरू झाल्यानंतर प्रतिभा चव्हाण यांनी आघाडी घेतली व लीड त्यांनी कायम राखत विजयाला गवसणी घातली. आमदार चव्हाण यांचा करीष्मा चाळीसगावात पुन्हा दिसून आला आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !