दिवाळी, निवडणूक संपली तरी भुसावळात हॉकर्स झोनचा प्रश्न कायम

नूतन सत्ताधार्‍यांकडून अपेक्षा : अप्सरा चौक, डिस्को टॉवर परिसरातील वाहतुकीचा प्रश्न कायम


Even after Diwali and the elections are over, the issue of the hawkers’ zone in Bhusawal remains unresolved भुसावळ (31 डिसेंबर 2025)  भुसावळ शहरातील अप्सरा चौक ते डिस्को टॉवर या गजबजलेल्या मार्गावर हॉकर्स झोनचा प्रश्न दिवाळी आणि पालिकेची निवडणूक आटोपल्यानंतरही अद्याप कायम आहे. दिवाळीनंतर हॉकर्स झोनची निश्चित प्रक्रिया राबविण्यात येईल, असे आश्वासन पालिकेकडून देण्यात आले होते मात्र निवडणुका संपून नवा सत्ताकाळ सुरू झाला आहे. यामुळे नवीन नगराध्यक्ष, नगरसेवक काय भूमिका घेतात ? याकडे लक्ष लागले आहे.

वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
अप्सरा चौक ते डिस्को टॉवर या मार्गावर फेरीवाले, हातगाड्या, तात्पुरती दुकाने मोठ्या प्रमाणावर असल्याने वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका आणि पादचार्‍यांना चालण्यास अडचणी निर्माण होत आहेत. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वीही या विषयावर आंदोलने झाली होती मात्र तरीही प्रश्न जैसे थेच आहे. पालिकेच्या अधिकार्‍यांकडून वेळोवेळी सर्वेक्षण, मोजणी, आराखडा तयार करण्याची चर्चा झाली, पण प्रत्यक्ष हॉकर्स झोन निश्चिती, परवानाधारक फेरीवाल्यांचे पुनर्वसन आणि अनधिकृत अतिक्रमण हटविणे या बाबींमध्ये ठोस निर्णय होत नसल्याचे चित्र आहे. आता निवडणूक संपल्याने तोही अडसर दूर झाला आहे.

नव्या सत्ताधार्‍यांकडून अपेक्षा
नवीन नगराध्यक्ष व नगरसेवक हा प्रश्न किती गांभीर्याने हाताळतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. एकीकडे फेरीवाल्यांच्या उपजीविकेचा प्रश्न तर दुसरीकडे शहरातील वाहतूक शिस्त व नागरिकांची सुरक्षितता या दोन्हींचा समतोल साधत लवकरात लवकर हॉकर्स झोनचा अंतिम निर्णय घेण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. आता केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष कृती कधी होणार, हाच खरा प्रश्न भुसावळकरांना सतावत आहे.

पालिकेच्या भूमिकेकडे लक्ष
अप्सरा चौक ते डिस्को टॉवर या मार्गावरील हॉकर्स धारकांना आठवडे बाजारात नवीन जागा देण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. दिवाळीनंतर त्यांचे स्थलांतर होणार होते मात्र, निवडणूक जाहीर झाल्याने हॉकर्सचा प्रश्न रेंगाळला होता. आता निवडणूक आटोपल्याने पालिका प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. त्यावेळी हॉकर्स धारकांनी केलेले उपोषण माजी आमदार संतोष चौधरी यांच्या मध्यस्थीने मागे घेतले होते त्यामुळे आता परिस्थिती बदलली आहे. आता नगराध्यक्ष व पालिका प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !