सुषमा अंधारे स्पष्टच म्हणाल्या ; भाजप फुटीच्या उंबरठ्यावर : भाजपचे घर बांधणारेच आज बेघर !
Sushma Andhare stated clearly: BJP is on the verge of a split; those who built the BJP’s house are themselves homeless today! मुंबई (1 जानेवारी 2026) : राज्यात भाजपामध्ये तिकीट वाटपावरून सुरू असलेल्या गोंधळानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी महायुतीवर टीकेचे बाण चालवत बोचरी टीका केली. कुणी आत्मदहनाचा प्रयत्न करतंय, कुणी एबी फॉर्म खाऊन टाकतंय, तर कुणी नेत्यांच्याच कानशिलात लगावतंय. ही रंजक परिस्थिती पाहता भाजप आता फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे स्पष्ट दिसत आहे, असे अंधारे म्हणाल्या आहेत.
भाजपाची तुलना इतिहासातील काँग्रेसशी
सुषमा अंधारे यांनी भाजपच्या सद्यस्थितीची तुलना इतिहासातील काँग्रेसशी केली. जेव्हा एखादा पक्ष अतिशक्तीशाली होतो आणि महत्त्वाकांक्षा वाढतात, तेव्हा त्यातूनच नवे पक्ष जन्माला येतात. भाजपमध्ये नाशिकच्या देवयानी फरांदे असोत किंवा सुधीर मुनगंटीवार यांची नाराजी हे सर्व आलबेल नसल्याचे लक्षण आहे. ज्या निष्ठावंतांनी वर्षानुवर्षे मेहनत करून भाजपचे घर बांधले, त्यांनाच आज बाहेरून आलेल्या ‘उपर्यां’साठी घराबाहेर काढले जात आहे, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.

पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचा ‘समन्वय’
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत अशी परिस्थिती नसल्याचा दावा अंधारे यांनी केला. आम्ही पुण्यात 80 ते 85 जागांवर लढत आहोत. जिथे एकापेक्षा अधिक इच्छुक होते, त्यांना सन्मानाने ‘मातोश्री’वर बोलावून त्यांची समजूत काढण्यात आली आणि मार्ग काढला गेला. आमच्याकडे बंडखोरीचे चित्र नाही, असे सुषमा अंधारेंनी नमूद केले.
ढवळ्या शेजारी पवळ्या…; अजित पवारांवर निशाणा
अजित पवार गटाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना दिलेल्या उमेदवारीवर अंधारे यांनी ‘वाण नाही पण गुण लागला’ या म्हणीचा आधार घेत टीका केली. त्या म्हणाल्या, अजित पवारांनी ज्या भाजपशी घरोबा केला आहे, तिथे आधीच भ्रष्ट, तडीपार आणि गुन्हेगार भरलेले आहेत. भाजपासोबत असेल तर गुन्हेगारांनाही निवडून आणता येते, ही खात्री पटल्यामुळेच अजित पवारांनी गुन्हेगारांना उमेदवारी देण्याचे धाडस केले आहे. लोकांच्या मतांचा आदर न करता राजकारणाचे जे गुन्हेगारीकरण सुरू आहे, ते अत्यंत निषेधार्ह आहे, असे म्हणत अंधारे यांनी मतदारांना या प्रवृत्तीचा विचार करण्याचे आवाहन केले.

