जादू टोण्यामुळेच झाला पराभव : शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराची पोलिसात तक्रार


The defeat was due to black magic : Shinde group’s candidate files a complaint with the police छत्रपती संभाजीनगर (2 जानेवारी 2026) : नुकत्याच नगरपंचायत व पालिकांच्या निवडणुका आटोपल्या व या निवडणुकीत अनेकांना पराभवाचे तोंड पहावे लागले मात्र छत्रपती संभाजीनगरात एका पराभूत उमेदवाराची सर्वत्र चर्चा आहे. या उमेदवाराने आपल्या पराभवामागे जादूटोणा कारणीभूत असल्याचा दावा करीत पोलिसात तक्रार दिल्याने आता पोलिस काय कारवाई करतात? याकडे लक्ष लागले आहे.

असे हा प्रकरण?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री नगरपंचायतीची निवडणूक 20 डिसेंबर रोजी पार पडली. मतदानाच्या दोन दिवस आधी प्रभाग क्रमांक 9 मधील भारत माता मतदान केंद्रासमोर संशयास्पद साहित्य आढळले
या साहित्याबाबत परिसरात जादूटोण्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या घटनेमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात तसेच मतदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले मात्र या प्रकरणावर आता शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 9 चे उमेदवार अमित वाहुळ यांनी थेट आरोप केले आहेत. निवडणुकीत पराभव स्वीकारताना त्यांनी आपला पराभव जादूटोण्यामुळेच झाल्याचा दावा केला.

मतदार भयभीत झाल्याने आपला पराभव
अमित वाहुळ यांच्या मते, मतदान केंद्रासमोर आढळलेल्या जादूटोण्याशी संबंधित साहित्यामुळे मतदार भयभीत झाले. या भीतीपोटी अनेक मतदारांनी मतदान करण्याचा निर्णय बदलला किंवा मतदानालाच न जाण्याचा पर्याय स्वीकारला. परिणामी, याचा थेट परिणाम मतदान आणि मतमोजणीवर झाला आणि त्यातूनच आपला पराभव झाला, असा आरोप त्यांनी केला आहे.

अमित वाहुळ यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत फुलंब्री पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. निवडणूक ही लोकशाहीची अत्यंत पवित्र आणि पारदर्शक प्रक्रिया असताना, अंधश्रद्धेचा वापर करून मतदारांवर मानसिक दबाव टाकण्याचा हा गंभीर प्रकार असल्याचं त्यांनी तक्रारीत नमूद केलं आहे. निवडणुकीच्या काळात जाणीवपूर्वक अशा प्रकारे भीतीचं वातावरण निर्माण करणं हे लोकशाही व्यवस्थेसाठी धोकादायक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन आणि जादूटोणा विरोधी कायद्यानुसार संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.

या तक्रारीनंतर आता पोलिस प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार, गुन्हा दाखल होणार की नाही, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !