भुसावळात रात्री दहानंतर डीजेचा दणदणाट होणार बंद अन्यथा गुन्हा : नूतन उपअधीक्षक अॅक्शन मोडवर
वाहनही होणार जप्त : उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन बंधनकारक : नियम मोडणार्यांची गय नाही
In Bhusawal, loud DJ music will be stopped after 10 PM, otherwise, a case will be registered: The new Deputy Superintendent is in action mode भुसावळ (2 डिसेंबर 2026) : भुसावळ शहरात रात्री दहा वाजेनंतर कुठेही डीजे वाजत असल्यास संबंधित डीजे चालकाविरुद्ध थेट गुन्हा दाखल करून डीजे वाद्य जप्त केले जाणार असून कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असा कडक इशारा नूतन डीवायएसपी केदार बारबोले यांनी दिला. बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी शहरातील डीजे व्यावसायिकांची झाली. यावेळी त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या.
रात्री 10 नंतर डीजे वाजल्यास दाखल होणार गुन्हा
डीवायएसपी बारबोले यांनी बैठकीत सांगितले की, रात्री 10 नंतर डीजे वाजविण्यास पूर्णतः मनाई आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित डीजे चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित डीजे व्यावसायिकाची राहील मात्र नियमांचे पालन नाकरणार्या कोणत्याही डीजे व्यावसायिकाची कोणत्याही प्रकारे गय केली जाणार नाही, शासनाने ठरवून दिलेल्या आवाजाच्या मर्यादांचे पालन करणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी सांगितले. नियमानुसार रात्री आवाजाची कमाल मर्यादा 45 डेसिबल इतकी आहे. यापेक्षा अधिक आवाज आढळल्यास डेसिबल मोजणी करून संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्यात येईल. डीजेमुळे नागरिकांना शारीरिक व मानसिक त्रास होतो, रस्त्यावरील ये-जा करणार्यांना अडथळे निर्माण होतात, तसेच डोळ्यांवर घातक परिणाम करणार्या तीव्र प्रकाश यंत्रणांचा (लेसर) वापरही धोकादायक असल्याचे त्यांनी नमूद केले.

आयएमएने दिले निवेदन
डीजे साठी वापरण्यात येणार्या बदललेल्या वाहनांना कोणतीही अधिकृत परवानगी नसून त्यातून होणारा प्रचंड आवाजही बेकायदेशीर आहे. यासंदर्भात गेल्या काही महिन्यांपूर्वी इंडीयन मेडीकल असोशिएशन (आयएमए)कडून पोलीस प्रशासनाकडे निवेदन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. डीजे व्यावसायीकांनी त्यांच्या नियमांमध्ये सुधारणा न केल्यास कायद्याचा आधार घेत कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनीही डीजे व्यावसायिकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या.
डीजे व्यावसायीकांची घेतली माहिती
बैंठकीत आलेल्या डीजे व्यावसायीकाचे नाव, गाव, त्यांच्या डीजे व्यवसायाचे नाव, त्यांचा राहण्याचा पत्ता, त्यांचे मोबाईल नंबर, त्यांच्या वाहनाचा प्रकार याची सविस्तर माहिती पोलीस प्रशासनाने यावेळी संकलीत केली. भविष्यात काही झाल्यास याच माहितीच्या आधारावर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.

