भुसावळच्या व्यापार्याचे 24 लाख लुटले : धुळ्यातील कुख्यात सत्तार शहाचा सहभाग : तिघांना बेड्या
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : 13 लाखांची रोकड जप्त
A businessman from Bhusawal was robbed of 24 lakhs : Notorious Sattar Shah from Dhule was involved : Three people arrested यावल (2 जानेवारी 2026) : चोपडा रस्त्यावरील चुंचाळे फाट्याजवळ रविवारी भर दुपारी भुसावळातील व्यापार्याच्या वसुली कर्मचार्याची दुचाकी अडवून चोरट्यांनी चाकूच्या धाकावर 24 लाखांची रोकड पळवली होती. जळगाव गुन्हे शाखेने या प्रकरणी पाच आरोपी निष्पन्न करीत तिघांना अटक केली. या प्रकरणात धुळ्यातील कुख्यात गुन्हेगार सत्तार शहादेखील सहभाग आढळला असून त्याच्यासह साथीदाराचा कसून शोध सुरू आहे.
या आरोपींना अटक
जुबेर खान हमीद खान (33, रा.चोपडा), शोएब शेख इस्माईल शेख (25) व ईस्माईल खान शेर खान (25, दोन्ही रा.हुडको, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे असून तिघांना गुरूवारी यावल न्यायालयात प्रथमवर्ग न्या.आर.एस. जगताप यांच्या न्यायासनासमोर हजर केले असता तिघांना सात दिवसांची अर्थात 7 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली तर या प्रकरणात धुळ्यातील अट्टल व सराईत गुन्हेगार साहील सत्तार शहा (रा.धुळे) व अनस शहा (जळगाव) यांचाही सहभाग आढळला असून ते पसार असल्याने त्यांचा कसून शोध सुरू आहे. अटकेतील तिघांकडून त्यांच्या वाट्याला आलेली 13 लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली.

काय आहे नेमके प्रकरण
यावल-चोपडा रस्त्यावरील चुंचाळे फाट्याजवळ रविवार, 28 डिसेंबर रोजी दुपारी भुसावळ येथील किराणा मालाचे व्यापारी राजू पारेख त्यांच्याकडील वसुली कर्मचारी किरण प्रभाकर पाटील (50, रा.राम मंदिर वॉर्ड, भुसावळ) हे दुचाकीने (एम.एच.19 डी.डब्ल्यू.0547) चोपडा गेले होते. येथून वसुलीची 24 लाखांची रक्कम एका बॅगमध्ये घेऊन ते भुसावळकडे निघाले होते. यावलकडे येताना साकळी गावाच्या अलीकडील चुंचाळे फाट्याजवळ चाकुचा धाक दाखवून त्यांच्याजवळील रोकड असलेली बॅग हिसकावून चोरट्यांनी पळ काढला होता.
यांनी केली कारवाई
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी अनिल बडगुजर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली. तपास सहायक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, हवालदार वासुदेेव मराठे, सागर कोळी करीत आहे.

