भाजपा अडचणीत ! अजित पवार स्पष्टच म्हणाले ; 70 हजार कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप करणार्यांसोबतच आपण सरकारमध्ये
BJP in trouble! Ajit Pawar stated clearly; we are in the government with those who accused us of 70,000 crore rupees worth of corruption पुणे (3 जानेवारी 2026) : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या एका वाक्याने भाजपा अडचणीत सापडली आहे. शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी सत्ताधारी भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत राजकीय वातावरण तापवले. माझ्यावर 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले मात्र ज्या लोकांनी माझ्यावर हे आरोप केले, त्यांच्याच सोबत मी आज सरकारमध्ये बसलो आहे, हे वास्तव आहे, असा थेट सवाल करत अजित पवारांनी भाजप नेत्यांना अडचणीत आणले. त्यांच्या या विधानामुळे पिंपरी-चिंचवडच्या निवडणूक प्रचारात नव्या वादाला तोंड फुटले.
आठ हजार कोटींंच्या ठेवी कुठे गेल्या ?
अजित पवार म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सुमारे 8 हजार कोटी रुपयांच्या ठेवी भाजपच्या सत्ताकाळात मोडण्यात आल्या. या ठेवी मोडून नेमकी कोणती विकासकामे झाली, याचा हिशोब जनतेसमोर मांडावा, अशी थेट मागणी त्यांनी केली.

सव्वाकिलोमीटर रस्त्यासाठी 81 कोटींचा निधी
भ्रष्टाचाराच्या मुद्यावर बोलताना अजित पवार अधिक आक्रमक झाले. पिंपरी-चिंचवडमध्ये भ्रष्टाचार इतका वाढला आहे की, अवघ्या सव्वा किलोमीटर रस्त्यासाठी 81 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला, असा धक्कादायक दावा त्यांनी केला. आम्ही कधीही सत्तेचा उन्माद होऊ दिला नाही, पण सध्याच्या सत्ताधार्यांना सत्तेची मस्ती, नशा आणि माज चढला आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे रस्ते विकास आणि निधी वाटपावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महापालिका भ्रष्टाचाराने पोखरली
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पूर्णपणे भ्रष्टाचाराने पोखरली असल्याचा आरोप करत अजित पवारांनी विविध प्रकल्पांचा उल्लेख केला. रस्ते, शिक्षण व्यवस्था, कुत्र्यांची नसबंदी यासारख्या मूलभूत सेवांमध्येही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे त्यांनी सांगितले. सत्ताधारी भाजपकडे शहराच्या विकासाचा कोणताही ठोस व्हिजन नसल्याचा आरोप करत त्यांनी थेट जनतेला आवाहन केले. पिंपरी-चिंचवडच्या जनतेने घड्याळ-तुतारीच्या युतीचे उमेदवार निवडून द्यावेत. मी रोज पाण्याची व्यवस्था करून दाखवीन. मी जे बोलतो, ते करून दाखवतो, तेवढी ताकद माझ्यात आहे, असे ठाम शब्दांत अजित पवार म्हणाले.
भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करण्याची तयारी
9आमच्या काळात शहरात सुसाट प्रवास होत होता, पण आज अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली रस्त्यांची वाट लावली आहे, असा टोला अजित पवारांनी लगावला. अनेक ठिकाणी अतिक्रमण वाढले असून तिथे हफ्तेखोरी सुरू असल्याचे चित्र दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या नऊ वर्षांत भाजपच्या सत्ताकाळात झालेला हा विकास जनतेने पाहावा, असे सांगत त्यांनी टेंडरमध्ये रिंग आणि भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करण्याची तयारी दर्शवली. पुराव्याशिवाय मी बोलत नाही, कोणावरही बिनबुडाचे आरोप करत नाही. ही राक्षसी भूक मला पाहवत नाही, अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आता या आरोपांवर भाजपकडून काय प्रत्युत्तर येते, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

