भुसावळातील उपनगराध्यक्षांच्या नावावर खलबते : भाजपामधील पाच नगरसेवकांना प्रत्येकी एकवर्ष मिळणार संधी


Deliberations underway regarding the name of the Deputy Mayor in Bhusawal : Five BJP corporators will get the opportunity for one year each भुसावळ (3 जानेवारी 2026) : भुसावळ पालिकेच्या निवडणूकीनंतर 25 दिवसांच्या आत विशेष सभा घेवून उपनगराध्यक्ष निवड करण्याचा नियम आहे. या नियमांनुसार याबाबत जिल्हाधिकार्‍यांचे आदेश मिळाल्यानंतर लवकरच विशेष सभा घेवून ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यामुळे शहरातील राजकारण पुन्हा गतीमान झाले आहे. शहरात आता उपनगराध्यक्ष, विषय समिती सभापती व स्विकृत नगरसेवक पदावर कोणाची वर्णी लागते? याकडे लक्ष वेधले गेले आहे. संधी न मिळालेल्यांचा प्रथम प्राधान्याने यात विचार केला जाण्याची शक्यता आहे.

27 जागांवर भाजपाचे वर्चस्व
पालिकेत 27 जागांवर भाजपचे निर्विवाद बहुमत असल्याने उपनगराध्यक्षपदी भाजप नगरसेवकांमधून एकाला संधी मिळेल? हे आता निश्चित झाले आहे. भाजपने एक वर्षाच्या काळाप्रमाणे पाच जणांना या पदावर संधी देण्याचे नियोजन केले आहे. यामध्येही जाती-पाती, निष्ठावान, गेल्या वेळी संधी न मिळालेले, अल्पसंख्यांक नगरसेवकांना संधी दिली जाणार आहे. पहिली संधी कोणाला मिळेल? याकडे राजकिय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

या नगरसेवकांची नावे चर्चेत
पालिकेत उपनगराध्यक्ष पदावर भाजपकडून कुणाला संधी मिळेल ? याची निश्चिती झाली नसली तरी नगरसेवकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. त्यात सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले व भुसावळकरांच्या गळ्यातील ताईत असलेले व गेल्या पंचवार्षिक काळात प्रबळ दावेदार असूनही संधी न मिळालेले निर्मल कोठारी तसेच लेवा पाटीदार समाजातील सोनल महाजन, परीक्षीत बर्‍हाटे, गिरीष महाजन, मराठा समाजाचे नगरसेवक राजेंद्र आवटे आदींची नावे सध्या चर्चेत आहेत. यातून पहिल्यांदा कोणाला संधी मिळेल? याकडेही लक्ष लागले आहे.

लवकरच प्रक्रिया पार पडेल
पालिकेची विशेष सभेमध्ये उपनगराध्यक्ष पदाची निवड केली जाणार आहे. ही सभा नवीन नियमांनुसार लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. या सभेबाबत पालिका प्रशासनाकडे अद्याप जिल्हाधिकार्‍यांकडून कोणत्याही सुचना मिळाल्या नाहीत मात्र ही सर्व प्रक्रिया सर्वसाधारण निवडणुकीनंतर 25 दिवसांच्या आत घ्यावी लागते, यामुळे लवकरच म्हणजे 15 जानेवारीपर्यंत ही याबाबतची प्रक्रिया पार पडेल.

सर्वानुमते निर्णय घेणार : युवराज लोणारी
भाजपकडून जातीय समीकरणांसोबतच मिरीटवरही उपनगराध्यक्षपद दिले जाणार आहे. पालिकेच्या कामकाजात पक्षाला फायदा व्हावा या अनुषंगाने स्विकृत नगरसेवक पदांवर अभ्यासू व निष्ठावंताना संधी दिली जाणार आहे. याबाबत मंत्री संजय सावकारे यांच्यासोबत बैठक घेवून विस्तृत चर्चा करून सर्वानुमते निर्णय घेतला जाणार असल्याचे भाजपा गटनेता युवराज लोणारी म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !