भुसावळच्या व्यापार्याचे 24 लाख लूटले : धुळ्यातील कुख्यात साहील शहासह साथीदार जाळ्यात
A businessman from Bhusawal was robbed of 24 lakhs : Notorious criminal Sahil Shah from Dhule and his accomplices have been apprehended जळगाव (3 जानेवारी 2026) : भुसावळातील व्यापार्याचे 24 लाख आणणार्या कर्मचार्याला यावल तालुक्यात लूटण्यात आल्याची घटना घडली होती. सुरूवातीला या गुन्ह्यात तीन आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार तथा धुळ्यातील कुख्यात गुन्हेगार साहिल शहा सत्तार शहा आणि त्याचा साथीदार अनस शहा अबुबकर शहा (जळगाव) यांना पोलिसांनी धुळे व जळगाव परिसरातून शिताफीने अटक केली. या गुन्ह्यात एकूण 17 लाख 36 हजारांची रोकड जप्त करण्यात आली.
असे आहे लूट प्रकरण
यावल-चोपडा रस्त्यावरील चुंचाळे फाट्याजवळ रविवार, 28 डिसेंबर रोजी दुपारी भुसावळ येथील किराणा मालाचे व्यापारी राजू पारेख त्यांच्याकडील वसुली कर्मचारी किरण प्रभाकर पाटील (50, रा.राम मंदिर वॉर्ड, भुसावळ) हे दुचाकीने (एम.एच.19 डी.डब्ल्यू.0547) चोपडा गेले होते. येथून वसुलीची 24 लाखांची रक्कम एका बॅगमध्ये घेऊन ते भुसावळकडे निघाले होते. यावलकडे येताना साकळी गावाच्या अलीकडील चुंचाळे फाट्याजवळ चाकुचा धाक दाखवून त्यांच्याजवळील रोकड असलेली बॅग हिसकावून चोरट्यांनी पळ काढला होता.

सापळा रचून आरोपींना अटक
या गुन्ह्यात यापूर्वी जुबेर खान हमीद खान (33, रा.चोपडा), शोएब शेख इस्माईल शेख (25) व ईस्माईल खान शेर खान (25, दोन्ही रा.हुडको, जळगाव) यांना अटक करण्यात आली होती व 13 लाखांची रोकडही जप्त करण्यात आली. या गुन्ह्यात धुळ्यातील कुख्यात गुन्हेगार साहिल शहा सत्तार शहा आणि त्याचा साथीदार अनस शहा अबुबकर शहा (जळगाव) पसार असल्याने त्यांनाही सापळा रचून अटक करण्यात आली. आरोपी साहिल शहा हा धुळे-चोपडा रोडवर आल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले तर दुसरा आरोपी अनस शहा याला जळगाव परिसरातून पकडण्यात आले.
धुळ्यातील गुन्हेगार कुख्यात
अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी साहिल शहा हा धुळ्यातील आझादनगर पोलीस ठाणे हद्दीतील सराईत आणि अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी घरफोडी, वाहन चोरी, मंदिर चोरी आणि अंमली पदार्थ कायद्यान्वये सहापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींकडून तीन लाख 42 हजारांची रोकड जप्त करण्यात आली. या गुन्ह्यात आजअखेर 17 लाख 36 हजारांची रोकड जप्त करण्यात आली. ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व सहकार्यांनी केली.

