चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई : गावठी कट्टा बाळगणार्या मालेगावच्या दोघांना अटक
Chopda rural police action: Two men from Malegaon arrested for possessing a country-made pistol चोपडा (3 जानेवारी 2026) : विनापरवाना गावठी कट्टा बाळगणार्या दोन तरुणांना चोपडा ग्रामीण पोलिसांना लासूर शिवारातून अटक केली आहे. पोलिसांनी 25 हजार रुपये किंमतीचा कट्टा व अडीच लाखांची हुंदाई कार मिळून एकूण दोन लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही संशयित आरोपी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील रहिवासी आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
चोपडा ग्रामीण पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, लासूर ते सत्रासेन उमटी रोडवरील ‘फौजी ढाब्या’जवळ एका पांढर्या रंगाच्या कारमधून प्राणघातक शस्त्र नेले जात आहे. त्यानुसार पोलिसांनी तातडीने सापळा रचला. शुक्रवारी, 2 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 5:25 वाजेच्या सुमारास संशयास्पद वाटणार्या हुंदाई कंपनीच्या कारला (क्रमांक एम.एच.48 एफ. 4104) अडवून तिची झडती घेतली असता, त्यात एक लोखंडी धातूचा गावठी बनावटीचा कट्टा (मॅगझीनसह) मिळून आला.

या प्रकरणी पोलिसांनी देविदास अभिमन पगार (18, रा.मुगसे, ता. मालेगाव) आणि मयुर संतोष निकम (23, रा.पाटणे, ता.मालेगाव, जि. नाशिक) या दोघांना ताब्यात घेतले आहे. दोघांकडून गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार नसीर बशीर तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे करीत आहे.

