भुसावळात रेल्वे प्रवाशांचे हाल : सरकता जिना ठरतोय ‘शोभेची वस्तू’

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आबालवृद्धांची कसरत : मुसाफिरखान्याजवळील एस्केलेटर बंद


Railway passengers in Bhusawal are facing difficulties: the escalator has become a mere ‘showpiece’ भुसावळ (4 जानेवारी 2026) : मध्य रेल्वेचे महत्त्वाचे जंक्शन असलेल्या भुसावळ रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुविधेसाठी लाखो रुपये खर्चून बसवण्यात आलेले आधुनिक तंत्रज्ञान सध्या धूळ खात पडले आहे. स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील मुसाफिर खान्याशेजारील सरकता जिना (एस्केलेटर) बंद असल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. जड बॅगा आणि पिशव्या घेऊन जिन्यावरून चढताना ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचे हाल होत आहेत. रेल्वे प्रशासनाच्या या ‘थंडा’ कारभारावर प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

प्रवाशांना दररोज मनस्ताप
भुसावळ स्थानकातून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून मुख्य प्रवेशद्वाराकडून फलाटावर जाण्यासाठी सरकता जिना कार्यान्वित करण्यात आला मात्र,सध्या हा जिना तांत्रिक कारणास्तव बंद आहे. यामुळे प्रवाशांना नाईलाजाने त्याच्यावरील आणि शेजारील पायर्‍यांचा वापर करावा लागत आहे. हातातील जड सामान, लहान मुले आणि वृद्ध प्रवाशांना उंचावर असलेल्या जिन्यावरून चढणे कठीण होत आहे.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गर्दीच्या वेळी बंद असलेल्या सरकत्या जिन्यामुळे पायर्‍यांवर प्रवाशांची गर्दी होत आहे. घाई घाईत रेल्वे पकडण्याच्या नादात एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रवाशांकडून रेल्वे विकास शुल्क आणि इतर कर वसूल केले जातात, मग सुविधा का मिळत नाहीत? सरकता जिना बंद असल्याने वृद्ध प्रवाशांना खूप त्रास होतोय. प्रशासनाने तातडीने याची दखल घ्यावी, अशी मागणी प्रवासी – यशवंत सोनवणे यांनी केली.

तपासाची आणि कारवाईची मागणी
हा जिना तांत्रिक बिघाडामुळे बंद आहे की देखभालीच्या कंत्राटातील त्रृटींमुळे, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. रेल्वेच्या तांत्रिक विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यास प्रवाशांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळे बंद असलेला सरकता जिना सुरू करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !