शिर्डीत साईचरणी आठ लाख भाविक नतमस्तक : दानाचा आकडा वाचून बसेल धक्का
Eight lakh devotees bowed down at the feet of Sai Baba in Shirdi; the amount of donations will leave you stunned शिर्डी (4 जानेवारी 2026) : देश-विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईनगरी शिर्डीत 25 डिसेंबर 2025 ते 2 जानेवारी 2026 दरम्यान आठ लाख भाविकांनी समाधीचे दर्शन घेतले. या काळात भाविकांनी श्रद्धेने तब्बल 23 कोटी 29 लाख 23 हजार 373 रुपये इतकी रेकॉर्डब्रेक देणगी साई संस्थानच्या झोळीत अर्पण केली, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
शिर्डीत गर्दीचा महापूर
नाताळची सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत आयोजित करण्यात आलेल्या ‘शिर्डी महोत्सवा’त साईभक्तांचा अभूतपूर्व जनसागर उसळला. महोत्सवाच्या काळात भाविकांनी विविध माध्यमांतून दान अर्पण केले. दानपेटीतून सहा कोटी दोन लाख 61 हजार 6 रुपये, देणगी काउंटरद्वारे तीन कोटी 22 लाख 43 हजार 388 रुपये, तर पीआरओ सशुल्क पासद्वारे दोन कोटी 42 लाख 60 हजार रुपये संस्थानला प्राप्त झाले. बदलत्या तंत्रज्ञानासोबत भाविकांनी डिजिटल देणगीलाही मोठी पसंती दिली. डेबिट-क्रेडिट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक आणि मनीऑर्डरद्वारे 10 कोटी 18 लाख 86 हजार 955 रुपये जमा झाले आहेत.

परकीय चलनातूनही देणगी
26 देशांच्या परकीय चलनातून 16 लाख 83 हजार 673 रुपये संस्थानला मिळाले. सोने-चांदीच्या स्वरूपातही मोठ्या प्रमाणावर दान प्राप्त झाले. यामध्ये 293 ग्रॅम सोने (किंमत सुमारे 36.38 लाख रुपये) आणि सुमारे 6 किलो चांदी (किंमत 9.49 लाख रुपये) यांचा समावेश आहे.
गर्दीचे चोख नियोजन
भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता साई संस्थानकडून दर्शन व्यवस्थेचे चोख नियोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर अन्नदानाची परंपराही मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आली. या नऊ दिवसांत सहा लाखांहून अधिक भाविकांनी साई प्रसादालयात मोफत भोजनाचा लाभ घेतला. तसेच एक लाख 9 हजार भाविकांना अन्न पाकिटांचे वाटप करण्यात आले. याच कालावधीत सात लाख 67 हजार लाडू पाकिटांच्या विक्रीतून 2.30 कोटी रुपये संस्थानला प्राप्त झाले, तर पाच लाख 76 हजार भाविकांना मोफत बुंदी प्रसादाचे वितरण करण्यात आले.

