गण गण गणात बोतेच्या जयघोषात भुसावळ दुमदुमले ; साकळी ते शेगाव पदयात्रेचे शहरात स्वागत
भुसावळ (5 जानेवारी 2026) : गेल्या 15 वर्षांची परंपरा जोपासत, साकळी (ता.यावल) येथून निघालेली संत गजानन महाराज पदयात्रा शहरात दाखल झाल्यानंतर ठिकठिकाणी भाविकांनी या पदयात्रेचे स्वागत केले. महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.
ठिकठिकाणी पदयात्रेचे स्वागत
यावल मार्गे शहरात आलेल्या या पदयात्रेचे गांधी पुतळा, तहसील कार्यालय, सहकार नगर आणि गोपाळ पोलीस चौकी परिसरात जंगी स्वागत करण्यात आले. पदमावती अपार्टमेंट येथे भाविकांनी पदयात्रेवर पुष्पवृष्टी केली. यावेळी महाराजांच्या पादुकांची मनोभावे आरती करण्यात आली. हा भक्तीचा सोहळा पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. या पदयात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे आकर्षक लाईटिंगने सजविलेला ‘महाराजांचा रथ’. रात्रीच्या सुमारास झगमगाटात न्हाऊन निघालेला हा रथ भाविकांचे लक्ष वेधून घेत होता. रथासमोर नतमस्तक होत असतानाच 100 हून अधिक पदयात्रींच्या मुखातून निघणारा गण गण गणात बोते हा जयघोष वातावरणात चैतन्य निर्माण करत होता.


15 वर्षांची अखंड परंपरा
साकळी येथून दरवर्षी शेगावपर्यंत ही पदयात्रा काढली जाते. यंदा या पदयात्रेचे 15 वे वर्ष असून, शिस्तबद्ध नियोजन आणि भक्तीची ओढ यामुळे ही यात्रा विशेष ठरत आहे. शहरात विविध ठिकाणी दर्शन घेतल्यावर, ही पदयात्रा रात्रीच्या मुक्कामासाठी ’लोणारी हॉल’ येथे विसावली. भाविकांच्या श्रद्धेने आणि शिस्तीने निघालेली ही पदयात्रा सोमवारी शेगावकडे मार्गस्थ होणार असून, भुसावळकरांसाठी हा अनुभव अत्यंत सुखद आणि आध्यात्मिक ठरला आहे. अत्यंत शिस्तीत एकाच गणवेशात पदयात्रेतील भाविक होते.







