खासदार संजय राऊतांचा सवाल : बाळासाहेबांची भीती वाटते म्हणून पुतळा झाकला का?
MP Sanjay Raut’s question: Was the statue covered because they are afraid of Balasaheb? मुंबई (5 जानेवारी 2026) : ठाण्यातील मनसे आणि शिवसेना उमेदवारांना पोलीस बळाचा वापर करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी नेले जात असल्याचा व्हिडिओ मनसे नेते अविनाश जाधव, शिवसेनेचे नेते राजन विचारे यांनी समोर आणल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले आहे शिवाय कुलाब्यातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा हिरव्या पडद्याने झाकल्याच्या घटनेवर राऊत यांनी बाळासाहेबांची भीती देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या मनात बसली आहे, म्हणूनच पुतळा झाकला गेला आहे, अशी टीका केली आहे.
निवडणूक आयोग दखल घेणार का ?
खासदार संजय राऊत म्हणाले की, ठाण्यामधील व्हिडिओ काल मनसे नेते अविनाश जाधव, शिवसेनेचे नेते राजन विचारे यांनी समोर आणला. हे अत्यंत गंभीर आहे. पोलीस मनसे किंवा शिवसेना उमेदवारांच्या घरात गेले, मग त्यांना पकडून गाडीत टाकून एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील घरी आणत आहेत. हे काम पोलिसांना दिले आहे आणि पोलिसही ते काम आपल्या वर्दीची शान न राखता इमाने इतबारे करत आहेत. किंबहुना पोलिसांचाही नाईलाज असेल. त्यांनाही चंद्रपूर, गडचिरोलीत पाठवण्याच्या धमक्या दिल्या असतील. परंतु, निवडणूक आयोगासमोर हे चित्र आल्यावर ते आता काय करणार? असा सवाल ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला.

आमचा पक्ष-चिन्ह चोरले, तरी आम्ही तुमच्यासमोर लढतोय
उमेदवारांना अशाप्रकारे नेत आहात, म्हणजे सत्ताधारी शिवसेना किंवा मनसेला घाबरलेले आहेत. तुमच्यासमोर ते लढायला नको आहेत. तुम्ही मशाल, इंजिन याची भीती घेतलेली आहे. तुम्ही आमचे पक्ष आणि चिन्ह चोरलेले आहे, तरी आम्ही तुमच्याशी लढायला तयार आहोत, तुम्हीही आमच्यासमोर लढा, असे थेट आव्हान संजय राऊत यांनी सत्ताधार्यांना दिले.
बाळासाहेबांच्या भीतीने त्यांचा पुतळा झाकला
कुलाब्यातील बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा हिरव्या पडद्याने झाकल्यानंतर संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेबांची भीती देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या मनात जी बसलेली आहे, ते भले ही हिंदूहृदय सम्राटांचा विचार वगैरे बोलत असतील, पण मुळात त्यांची भीती तुमच्या मनात असल्याने तुम्ही त्यांचा पुतळा झाकला आहे. बाळासाहेब ठाकरे आता एका राजकीय पक्षाचे नेते राहिलेले नाहीत. त्यांना तुम्ही राष्ट्रपुरुषाचा दर्जा दिलाय. तुम्ही गांधींजींचा पुतळा झाकलाय का? मुंबईतील अटल बिहारी वाजपेयींचे पुतळे झाकलेत का? मग बाळासाहेब ठाकरेंचाच पुतळा का झाकला? याचे उत्तर कोण देणार? तुमची लायकी नसताना, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने अजुनही मते मागत आहात मग बाळासाहेबांचा पुतळा का झाकत आहात? असा सवाल संजय राऊत यांनी सत्ताधार्यांना केला.

