धुळ्यातील गुरुद्वारा परिसरात दोन गट भिडले : लाठ्या-काठ्यांसह तलवारीचा वापर ; परस्परविरोधी गुन्हा


Two groups clashed in the Gurudwara area of ​​Dhule : sticks, rods, and swords were used; cross-complaints filed. धुळे (5 जानेवारी 2026) : धुळ्यातील गुरुद्वारात संत श्री धीरजसिंहजी यांच्या हत्येनंतर दोन गटात सुप्त संघर्ष वाढला आहे. त्यातच गुरुगोविंदसिंग जयंतीच्या कार्यक्रमास विरोध व गुरुद्वाराचे गेट बंद केल्याच्या कारणातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना रविवार, 4 रोजी दुपारी घडली. हाणामारीत लाठ्या-काठ्या, तलवारी तसेच अंगावर फायर एक्सटिंगूशेर गॅस सोडण्यात आला. पोलिस प्रशासनाने धाव घेत सौम्य लाठीमार करीत जमाव पांगवला. या प्रकरणी धुळे शहर पोलिसात दोन गटाविरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिस प्रशासनाने या परिसरात आता चोख बंदोबस्त तैनात केला आहे.

दोन्ही गटाचा हल्ला
धुळ्यातील गुरुद्वाराप्रमुख संत श्री धीरजसिंहजी यांच्या हत्येनंतर दोन गटातील सुप्त संघर्षानंतर अनेकदा छोट्या-मोठ्या घटना घडल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी वारंवार समज देवूनही उपयोग झाला नाही. त्यातच गुरुद्वाराचे गेट बंद करण्यात आल्याने व 5 रोजी गुरुगोविंदसिंग जयंतीच्या कार्यक्रमास विरोध केल्याच्या वादातून दोन गट भिडले. लाठ्या-काठ्या तसेच तलवारीचा सर्रास वापर झाला.

पोलिसांची वेळी धाव
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संतप्त जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जयंती कार्यक्रमास विरोध : 12 जणांविरोधात गुन्हा, संशयीत ताब्यात
धुळे शहर पोलिसात सत्येंद्रपाल लाडद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयीत रणबीरसिंग खालसा यांच्या सांगण्यावरून फिर्यादी व साक्षीदारांच्या अंगावर फायर एक्सटिंगूशेर गॅस सोडून, दगडफेक करण्यात आली तसेच लोखंडी रॉड, तलवार, लाठ्या काठ्यांनी मारहाणी करीत गंभीर दुखापती करण्यात आल्या तसेच 5 रोजी गुरुद्वारामध्ये गुरुगोविंदसिंग जयंतीचा कार्यक्रमास विरोध करण्यात आाल. या प्रकरणी संशयीत रणबीरसिंग खालसा, जगबीरसिंग हरप्रीत सिंग संधू, शाविंदरसिंग राजवंतसिंग, गुरप्रीतसिंग बसंतसिंग, संदीपसिंग भवरलाल, गुरिंदरसिंग लखबीरसिंग (जखमी असून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल), दर्शनसिंग सुखदेवसिंग खालसा, दलरसिंग अमीरसिंग, . लालसिंग सिंगरसिंग, सुदेशसिंग बच्चनलाल, दारासिंग मखनसिंग, करतारसिंग जगरसिंग यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुरुद्वारात प्रवेश नाकारला : तिघांविरोधात गुन्हा
दुसर्‍या गटातर्फे भूपेंद्रसिंग किसनसिंग (66) यांनी तक्रार दिल्यावरून संशयीत रणबीरसिंग सुखदेवसिंग खालसा, दलेरसिंग निहंग (रा.अमृतसर), जगविंदरसिंग हजारप्रित सिंग (रा.पंजाब) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीतांनी रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गुरुद्वाराचे मुख्य प्रवेश द्वाराचे लोखंडी गेट बंद करून फिर्यादी व शीख बांधवाच्या संगतमधील साक्षीदारांना गुरुद्वारामध्ये प्रवेश नाकारून जिवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !