सत्तेसाठी भाजपाची एमआयएमसोबत युती : मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय


BJP forms alliance with MIM for power: Chief Minister takes a major decision मुंबई (7 जानेवारी 2026) : सत्ता मिळवण्यासाठी भाजपने अकोट आणि अंबरनाथ नगरपरिषदांमध्ये अनुक्रमे एमआयएम आणि काँग्रेससोबत केलेल्या हातमिळवणीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाल्यानंतर विरोधकांनी भाजपाला कात्रीत पकडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. काँग्रेस आणि एमआयएमसोबत कोणतीही युती चालणार नाही. अशी युती म्हणजे अनुशासनहीनता आहे. ही युती तोडावीच लागेल. ही युती करणार्‍यांवर कारवाई होईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांनी घेतली भूमिका
राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहत असतानाच, अकोट आणि अंबरनाथमध्ये भाजपने सत्तेसाठी केलेल्या स्थानिक आघाड्यांनी सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अकोटमध्ये ‘एमआयएम’ आणि अंबरनाथमध्ये ’काँग्रेस’सोबत भाजपने संसार थाटल्याने विरोधकांनी भाजपला लक्ष्य केले आहे मात्र या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक नेत्यांवर प्रचंड नाराजी व्यक्त केली असून संबंधितांवर कारवाईचा इशारा दिला आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
अकोटमध्ये भाजपने एमआयएमसोबत तर अंबरनाथमध्ये काँग्रेसशी युती झाल्याने देवेंद्र फडणवीसांनी स्थानिक नेत्यांवर प्रचंड नाराज झाले आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एबीपी नेटवर्क’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, स्थानिक पातळीवर काँग्रेस किंवा एमआयएमसोबत कोणतीही युती खपवून घेतली जाणार नाही. ही युती तत्वशून्य आहे आणि ती होऊच शकत नाही. अशी युती म्हणजे अनुशासनहीनता आहे आणि ती तोडावीच लागेल. स्थानिक नेत्यांनी जरी हा निर्णय घेतला असला, तरी तो पूर्णपणे चुकीचा आहे. ज्याने कोणी ही युती घडवून आणली असेल, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. यासंदर्भात आम्ही आदेश दिले आहेत.

विरोधकांच्या हाती कोलीत
भाजपच्या या स्थानिक प्रयोगांमुळे विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले आहे. भाजप सत्तेसाठी काहीही करू शकते, हे यातून सिद्ध झाले आहे, अशी टीका विरोधकांकडून होत आहे मात्र मुख्यमंत्र्यांच्या कडक पवित्र्यामुळे आता अकोट आणि अंबरनाथमधील भाजपच्या स्थानिक पदाधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !