भुसावळात स्टंटबाजी करणार्‍यांना उघडे पाडणार ! ; पडद्यामागचे चेहरेही समोर येणार : माजी आमदार संतोष चौधरी

चौधरी उवाच : संकुलाच्या जागेवर ‘त्या’ जलकुंभाची उभारणी ; पालिकेत निघणार्‍या बोगस बिलांना आता चाप


गणेश वाघ
Those performing stunts in Bhusawal will be exposed! The faces behind the scenes will also be revealed: Former MLA Santosh Chaudhary भुसावळ (7 जानेवारी 2026) : भुसावळात अमृत योजनेच्या जलकुंभाचे काम बंद पाडण्यावरून सत्ताधारी-भाजपा विरोधकांमध्ये सामना रंगला असतानाच बुधवार, 7 रोजी माजी आमदार संतोष चौधरी यांनी वादात उडी घेतली आहे. भाजपा नगरसेवकांना स्टंटबाज म्हणत त्यांनी मुळात जलकुंभाच्या जागेवर व्यापारी संकुल मंजूर असल्याची माहिती देत काहींना संतोषी माता सभागृहाजवळ जागा पचवायची असल्याने हा प्रकार घडल्याचा खळबळजनक दावा केला आहे. भुसावळ पालिकेत आता बोगस बिले काढण्याच्या प्रकाराला चाप बसणार असल्याचे सांगत ते म्हणाले की, भुसावळात अमृतच्या सर्व जलकुंभांची तपासणी होईल, वापरण्यात आलेल्या पाईपांचा दर्जाही तपासू, असे सांगून त्यांनी खळबळ उडवून दिली.

‘ती’ जागा घशात घालण्याचा प्रयत्न
शनी मंदिर वॉर्डातील निवासस्थानी माजी आमदार चौधरींनी पत्रकार परिषदेत आरोपांच्या फैरी झाडल्या. ते म्हणाले, गंगाराम प्लॉट भागातील संतोषी माता मंदिराजवळ जलकुंभाचे काम थांबवण्याचे निर्देश नगराध्यक्षांनी नव्हे तर मुख्याधिकार्‍यांनी दिले व तसे स्पष्टीकरणही त्यांनी माध्यमांना दिले. आता या प्रश्नावर धूर उठू लागल्यानंतर आपण सखोल चौकशी केल्यानंतर मुळात त्या जागेवर व्यापारी संकुल मंजूर असल्याचे समोर आले मात्र असे असताना तेथे जलकुंभ बांधण्याचा अट्टहास का? असा प्रश्न त्यांनी करीत या भागातून उचललेली माती संतोषी माता सभागृहाजवळ टाकण्यात आल्याने ती जागा पचवण्याचा काहींचा डाव असल्याचे त्यांनी नमूद केले. मूळातच या जलकुंभाचे काम बंदच होते, असे सांगून त्यांनी सांगितले की, कोणत्या जागेवर जलकुंभ बांधायचा वा नाही हे नगराध्यक्ष व त्या प्रभागाचा नगरसेवक ठरवणार आहे. भुसावळकर सुशिक्षित असून त्यांना काही अनपढ लोक शिकवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा पलटवार त्यांनी कुणाचेही नाव न घेता केला.

बोगस बिले निघण्यास लागणार चाप
भुसावळात अमृत योजनेचे जे काही जलकुंभ बांधण्यात आले आहेत त्यांच्या दर्जाची आता तपासणी केली जाईल शिवाय जी पाईपलाईन टाकण्यात आली आहे त्याचाही दर्जा तपासू, असे माजी आमदार चौधरींनी सांगितले. मुळातच या योजनेचा स्त्रोत बदलवून खर्च वाढवण्यात आला व शंभर कोटींचा वाढीव खर्च एका मक्तेदाराच्या लाभासाठी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शहरात निर्माण झालेला प्रश्न ज्यांची कामे बोगस आहेत, त्यांचीच उठाठेव असून आता धूर कुठून निघतोय? हे कळू लागल्याचे ते म्हणाले. पालिकेतील बोगस बिले निघण्यावर आता आळा बसणार असून अगदी गटारीचे काम केले असल्यास प्रत्यक्ष पाहणी होईल, उतार आहे वा नाही, क्वालिटी बांधकाम झाले वा नाही याची तपासणी करूनच बिले मंजूर होतील, असेही त्यांनी सांगितले.

संकुलांचा प्रश्न मार्गी लावणार : पालिकेचेही स्थलांतर
भुसावळातील अनेक संकुलाची मुदत संपली असून काही संकुलप्रश्नी गाळे धारक न्यायालयात गेल्याने त्यांची समजूत काढून त्यांनाच आम्ही गाळे देवू व जुन्या पालिकेच्या जागी भव्य नऊ मजली ईमारत बांधण्यात येणार असून आगामी काळात शहरातील उद्यानांना उर्जितावस्था देवू तसेच छत्रपती शिवाजी संकुलातील मुतार्‍यांमध्ये झालेले अतिक्रमण आपण हटवणार असून अन्य पालिका संकुलात झालेले अतिक्रमण आपण हटवू, असे त्यांनी स्पष्ट केले. तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता व्यवसायाकडे वळावे यासाठी आपण शहरात नव्याने संकुलाची उभारणी करू, असेही त्यांनी सांगितले. भुसावळ पालिकेचे संत गाडगेबाबा ग्रामीण रुग्णालयात स्थलांतर करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त करीत 26 जानेवारी शक्य झाल्यास तेथे ध्वजारोहण होईल, असेही त्यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती
यावेळी नगराध्यक्ष गायत्री भंगाळे, प्रतोद उल्हास पगारे, प्रा.उत्तम सुरवाडे आदी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !