जळगावात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘रोड शो’
Deputy Chief Minister Eknath Shinde’s ‘road show’ will be held in Jalgaon today जळगाव (8 जानेवारी 2026) : महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गुरुवार, 8 रोजी दुपारी एक वाजता ‘रोड शो’ आयोजित करण्यात आला आहे. जवळपास तीन हजार मीटरचा रोड शो असणार आहे. त्यासाठी किमान चार तास लागण्याचा अंदाज असून रोड शो जसजसा पुढे जाईल तस-तसे रस्ते वाहतुकीला बंद केले जातील.
उपमुख्यमंत्री आज जिल्ह्यात
राज्यातील 29 महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रमुख नेत्यांकडून राज्यभरात प्रचाराचा झंझावात पाहायला मिळत आहे. दोन दिवसापूर्वीच जळगाव शहरात महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो आयोजित करण्यात आला होता. यानंतर गुरुवारी उपमुख्यमंत्री शिंदे यांचा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येत आहेत.

असा असणार ‘रोड शो’चा मार्ग
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या रोड शोला गुरुवारी दुपारी एक वाजता कोर्ट चौकातून सुरुवात होईल. सरळ चित्रा चौक, सुभाष चौक, घाणेकर चौकमार्गे लालबहादूर शास्त्री चौक ओलांडून नेहरू चौकातून रेल्वे स्थानकाकडे रवाना होईल. येथे उपमुख्यमंत्री शिंदे डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून रोड शोचा समारोप करतील.
ठिकठिकाणी रोखणार वाहतूक
रोड शो मार्गावरील पहिला चौक चित्रा चौक, पुष्पलता बेंडाळे चौकातून येणारी वाहतूक भंगाळे गोल्ड येथे रोखली जाईल. सुभाष चौकात सराफ बाजार व दाणाबाजार येथून येणारी वाहतूक थांबवण्यात येईल. घाणेकर चौकात शनिपेठ, वाल्मीक नगरकडून येणारी वाहतूक रोखली जाईल. टॉवरपासून उपमुख्यमंत्र्यांचे वाहन पुढे जाईल तोपर्यंत शिवाजीनगर व जुने बसस्थानकाकडून येणारी वाहने रोखण्यात येतील. पुढे रेल्वे स्थानकाकडे जाताना गोविंदा रिक्षा स्टॉप येथे वाहतूक रोखली जाईल, असे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी सांगितले.
बंदोबस्तासाठी 500 पोलिस
मुख्यमंत्र्यांच्या रोड शोसाठी 500 पोलिसांचा बंदोबस्त 1700 मीटर अंतरात तैनात करण्यात आला होता. तेवढाच बंदोबस्त उपमुख्यमंत्री शिंदेंच्या रोड शोसाठी असेल. प्रत्येक चौकात पोलिसांची सूक्ष्म नजर राहील, असे उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांनी सांगितले.
‘नो फ्लाईंग झोन’ घोषित
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौर्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने संभाव्य धोका लक्षात घेता जळगाव शहरातील कार्यक्रमस्थळ तसेच जळगाव विमानतळ परिसर ‘नो फ्लाईंग झोन’ घोषित करण्यात आला आहे. 8 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11.30 वाजेपासून दुपारी 4.00 वाजेपर्यंत जळगाव विमानतळ व जळगाव शहरातील नियोजित कार्यक्रम परिसरात ड्रोन तसेच तत्सम उडणार्या यंत्रणांच्या वापरावर व प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.

