भुसावळात भाजपा नगरसेवक पिंटू कोठारी आक्रमक : मंत्र्यांचा विकासाला विरोध नाहीच ! अमृत योजनेच्या विलंबाचे स्पष्ट कारणच सांगितले
गणेश वाघ
BJP corporator Pintu Kothari in Bhusawal takes an aggressive stance: Ministers are not at all opposed to development! He clearly explained the reason for the delay in the Amrut Yojana projectभुसावळ (8 नोव्हेंबर 2026) : भुसावळ पालिकेत अमृत योजनेला विलंब झाला व योजनेचा खर्च वाढला यात आमचे दुमत नाहीच मात्र अमृत योजनेला विलंब का झाला? याचे कारणही जाणून घेतले पाहिजे, असे भुसावळचे नगरसेवक पिंटू कोठारी यांनी भाजपाच्या पत्रकार परिषदेत सांगत लक्ष वेधले. ते म्हणाले की, कोरोनाचा कार्यकाळ साधारण अडीच वर्ष राहिल्याने कामाला विलंब झाला व या काळात पाईप लाईन तसेच अन्य साहित्याचा खर्च वाढल्याने साहजिकच योजनेचा खर्चही वाढला मात्र केवळ राजकारण करून अमृत योजनेच्या जलकुंभाचे काम बंद करणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.
जाब विचारणे म्हणजे दबावतंत्र नव्हे
जलकुंभाचे काम चार दिवसांपूर्वी बंद करण्यात आल्याने त्याचा भाजपेयींनी जाब विचारला व हा प्रकार दबावतंत्राचा नव्हे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

कोरोनामुळे योजनेचे काम लांबले
साधारण दोन ते अडीच वर्ष कोरोना आल्याने अमृत योजनेला विलंब झाला व योजनेवरील खर्चही वाढला. रिटेंडर झाल्यानंतर काही ठिकाणी पाईप लाईन वाढवण्यात आली व प्रस्ताव मंजुरीसाठी गेल्यानंतर त्यास काही अंशी विलंब झाला, असेही कोठारी म्हणाले.
विकासकामांना विरोध नाही मात्र चुकीच्या कामांना विरोध असेल
नगराध्यक्षांनी विकासाच्या मुद्यावर बोलावे आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत, त्यावेळी आम्ही एकसंघ होवून स्वाक्षर्या करू मात्र चुकीची कामे होत असल्यास निश्चितपणे आपला विरोध असेल, असे त्यांनी बजावले. भुसावळच्या विकासासाठी मंत्री संजय सावकारे कटीबद्ध असून त्यांनी अलीकडेच डीपीडीसीतून प्रभाग 21 ला तीन कोटींचा निधी दिला व त्यातून त्यांची शहरविकासाची दूरदृष्टी दिसून येेते व यापुढेही ते शहराच्या विकासाला बांधील असल्याचे ते म्हणाले.
यांची पत्रकार परिषदेला उपस्थिती
यावेळी गटनेता युवराज लोणारी, उपगटनेता परीक्षीत बर्हाटे, किरण कोलते, पिंटू कोठारी, गिरीश महाजन, राजेंद्र आवटे, महेंद्रसिंग ठाकूर निक्की बत्रा, विशाल नाटकर, सुजित भोळे, संदीप सुरवाडे, अॅड.बोधराज चौधरी, बापू महाजन, देवा वाणी, कैलास चौधरी, प्रशांत नरवाडे, बाळा सोनवणे, रुपेश देशमुख, अल्बर्ट तायडे आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

