एक हजारांची लाच घेताना पारोळ्यातील वायरमन नंदुरबार एसीबीच्या जाळ्यात
सौर कृषी पंपाचे सर्वेक्षण करण्यासाठी स्वीकारली लाच : कारवाईने लाचखोर हादरले
गणेश वाघ
A wireman from Parola was caught in the net of the Nandurbar ACB while accepting a bribe of one thousand rupees भुसावळ (9 जानेवारी 2026) : सौर कृषी पंपासाठी विहिर सर्वेक्षण करण्यासाठी तडजोडीअंती एक हजारांची लाच स्वीकारताना पारोळा येथील वीज कंपनीचा वरिष्ठ तंत्रज्ञ भाऊसाहेब गोरख पाटील (33) यास नंदुरबार एसीबीने अटक केली. पारोळा तालुक्यातील चोरवड येथे गुरुवार, 8 रोजी सायंकाळी उशिरा ही कारवाई करण्यात आल्यानंतर लाचखोर हादरले आहेत.
असे आहे लाच प्रकरण
मूळ तक्रारदार शेतकरी आहेत. त्यांनी 21 जून 2025 रोजी पत्नीच्या नावे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेंतर्गत मौजे पोपटनगर शिवार, ता.पारोळा येथील शेतात कृषी पंप बसवण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला. त्यानंतर सर्वेक्षणासाठी 20 सप्टेंबर 2025 अशी तारीख मिळाली मात्र वीज कंपनीकडून कुणीही आले नाही तर 4 जानेवारी तक्रारदाराने वरिष्ठ तंत्रज्ञ भाऊसाहेब पाटील यांना फोन केल्यानंतर त्यांनी सर्वेक्षणासाठी पंधराशे रुपयांची लाच मागून एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवल्यानंतर नंदुरबार एसीबीकडे 8 जानेवारीला तक्रार नोंदवण्यात आली.

चोरवड येथे केली अटक
लाच पडताळणीनंतर एसीबीने चोरवड, ता.पारोळा येथे गुरुवारी सापळा रचला व एक हजार रुपयांची लाच स्वीकारताच भाऊसाहेब पाटील यांना अटक करण्यात आली. या कारवाईने वीज वितरणच्या लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.
यांनी केला सापळा यशस्वी
नंदुरबार एसीबीचे डॅशिंग पोलिस उपअधीक्षक प्रशांत भरते यांच्या नेतृत्वात हवालदार विजय ठाकरे, नरेंद्र पाटील, नाईक हेमंतकुमार महाले आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

