भुसावळात व्यापारी व हातगाडी चालकांचा वाद पोलीस ठाण्यात : मार्केट दुपारपर्यंत बंद


A dispute between traders and handcart operators in Bhusawal led to a confrontation at the police station; the market remained closed until the afternoon भुसावळ (9 जानेवारी 2026) : शहरातील वर्दळीच्या अप्सरा चौकात दुचाकी पार्क करण्याच्या वादातून व्यापारी व हातगाडी चालकांमध्ये शाब्दीक वाद उफाळल्यानंतर व्यापारी व विक्रेते थेट बाजारपेठ पोलिस ठाण्यात पोहोचले. भीतीपोटी व्यापार्‍यांनी दुकाने बंद ठेवल्याचा प्रकार शुक्रवार, 9 रोजी शहरात घडला. या प्रकरणी सायंकाळपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, पालिकेने हॉकर्स झोन जाहीर केल्यानंतर या संदर्भात कुठलेही धोरण स्वीकारले नसल्याने दिवसागणिक हा तिढा वाढत चालला आहे. या संदर्भात वेळीच पालिका प्रशासनाने दखल न घेतल्यास भविष्यातही व्यापारी व विक्रेत्यांमध्ये संघर्ष कायम राहण्याची चिन्हे आहेत.

काय घडले भुसावळात?
भुसावळच्या अप्सरा चौकात सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास दुकानासमोर मोटारसायकल उभी करण्यावरून एका लोडगाडी चालक आणि दुकानदारात शाब्दिक वाद झाला व हा वाद वाढत गेल्यानंतर गोंधळाच वातावरण निर्माण झाले. वाद वाढत असल्याची माहिती मिळताच आसपासच्या व्यापार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

व्यापार्‍यांनी दुकाने बंद करीत गाठले पोलिस ठाणे
संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने छबीलदास कपडा मार्केटमधील व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद केली व अचानक दुकाने बंद झाल्यामुळे बाजारात आलेल्या ग्राहकांची मोठी गैरसोय झाली. घटनेनंतर व्यापारी आणि ठेलेवाले मोठ्या संख्येने बाजारपेठ पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाले. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या मात्र प्रत्यक्षात सायंकाळपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत अप्सरा चौक व परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला.

सत्ताधारी व पालिका प्रशासनाने दखल घ्यावी
अप्सरा चौक हा शहरातील अत्यंत गजबजलेला भाग आहे. यापूर्वी येथै व्यापारी व लोटगाडी लावणार्‍या विक्रेत्यांमध्ये वाद झाला आहे त्यामुळे विक्रेत्यांना हॉकर्स झोनच्या माध्यमातून जागा निश्चित करण्यात आली मात्र पालिकेने या जागेवर सुविधा दिल्या नसल्याने हा प्रश्न रेंगाळला आहे. सत्ताधारी व पालिका प्रशासनाने वेळीच हॉकर्स झोनचा प्रश्न मार्गी न लावल्यास भविष्यातही अप्रिय घडतील, अशी स्थिती आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !