भुसावळकरांनो खबरदार : वाहतूक नियम मोडल्यास आता ऑनलाईन होणार दंड
सीसीटीव्हीद्वारे वाहन धारकांवर पोलिसांची निगराणी : मोबाईलवर येणार दंडाची पावती : डीवायएसपी केदार बारबोले यांचा अभिनव उपक्रम
Beware, residents of Bhusawal: Fines for violating traffic rules will now be issued online भुसावळ (9 जानेवारी 2026) : भुसावळ शहरातील वाहतूक कोंडीला शिस्त लावण्यासाठी आणि नियम मोडणार्या बेशिस्त वाहनधारकांना लगाम घालण्यासाठी भुसावळ पोलिस आता हायटेक झाले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील सीसीटीव्ही कंट्रोल रूमच्या माध्यमातून आता वाहतूक नियम मोडणार्यांवर थेट ‘ऑनलाइन’ दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामुळे आता भरचौकात पोलिस नसलेतरी वाहतूक नियम मोडल्यास तिसर्या डोळ्याच्या अर्थात सीसीटीव्हीच्या माध्यमातून तुमच्यावर दंडात्मक कारवाई होईल.
अशी होणार कारवाई
शहरातील विविध मुख्य चौकांमध्ये आणि संवेदनशील भागात बसवण्यात आलेल्या उच्च क्षमतेच्या सीसीटीव्ही कॅमेर्यांचे थेट प्रक्षेपण डीवायएसपी कार्यालयातील कंट्रोल रूममध्ये दिसते. या ठिकाणी आता एका विशेष कर्मचार्याची नियुक्ती करण्यात आली असून हा कर्मचारी स्क्रीनवर सतत लक्ष ठेवून असेल. ट्रिपल सीट प्रवास करणे, विना हेल्मेट दुचाकी चालवणे, सिग्नल तोडणे किंवा नो-पार्किंगमध्ये वाहन उभे करणे, अशा चुका आढळताच संबंधित वाहनाचा नंबर टिपून त्याला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार ऑनलाईन ई-चलन धाडले जाणार आहे.

असे आहे उद्दिष्ट
शहरातील अपघातांचे प्रमाण कमी करणे
वाहतुकीला शिस्त लावणे आणि गुन्हेगारी हालचालींवर बारीक लक्ष ठेवणे
प्रत्यक्ष रस्त्यावर पोलिस नसतानाही नागरिकांनी नियमांचे पालन करावे, हा धाक निर्माण करणे
वाहनधारकांनी नियम पाळावेत
शहराची सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्था सुदृढ करण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून केवळ गुन्हेगारांवरच नाही, तर वाहतूक नियम मोडणार्यांवरही आता 24 तास लक्ष असेल. नागरिकांनी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी नियमांचे पालन करावे, असे पोलिस उपअधीक्षक केदार बारबोले म्हणाले
वाहतूक शाखेसह पथकाकडून अंमलबजावणी
हा अभिनव उपक्रम डीवायएसपी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक उमेश महाले व त्यांचे सहकारी राबवत आहेत. कंट्रोल रूममधून मिळालेल्या माहितीच्या आधारे तत्काळ कारवाईची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. यामुळे शहरातील बेशिस्त वाहनधारकांचे आता धाबे दणाणले आहेत. पुढील पाऊल: ही मोहीम येत्या काळात अधिक तीव्र केली जाणार असून, दंडाची रक्कम न भरणार्या वाहनांवर जप्तीची कारवाई देखील होऊ शकते.

