धुळ्यातील गुरुद्वारातील हल्ला प्रकरण : संशयीत आरोपीच्या घरात सापडल्या 43 बंदुकीच्या गोळ्या
आरोपीच्या अडचणी वाढल्या : दोन मॅग्जीनही पोलिसांकडून जप्त
Dhule Gurdwara attack case: 43 bullets recovered from the suspected accused’s house धुळे (10 जानेवारी 2026) : धुळ्यातील गुरुद्वारात संत श्री धीरजसिंहजी यांच्या हत्येनंतर दोन गटात वाढलेल्या संघर्षानंतर गुरुगोविंदसिंग जयंतीच्या कार्यक्रमास विरोध व गुरुद्वाराचे गेट बंद केल्याच्या कारणातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना रविवार, 4 रोजी दुपारी घडली होती. या प्रकरणी दोन्ही गटाविरोधात शहर पोलिसात गुन्हे दाखल होते. या गुन्ह्यांमधील आरोपी रणबीरसिंग सुखदेवसिंग खालसा याच्या गुरुद्वारातील निवासस्थानातून पोलिसांना तब्बल 43 जिवंत काडतूस आढळल्या असून त्यासोबत दोन मॅग्जीनही आढळल्याने आरोपीच्या अडचणीत वाढ झाली आहे.
आठवडाभरापूर्वीच झाला होता हल्ला
धुळ्यातील गुरुद्वाराप्रमुख संत श्री धीरजसिंहजी यांच्या हत्येनंतर दोन गटातील सुप्त संघर्ष वाढला आहे. त्यातच गुरुद्वाराचे गेट बंद करण्यात आल्याने व 5 रोजी गुरुगोविंदसिंग जयंतीच्या कार्यक्रमास विरोध केल्याच्या वादातून दोन गट भिडल्यानंतर लाठ्या-काठ्या तसेच तलवारीचा सर्रास वापर झाला होता.

तलवारीसह लाठ्या-काठ्यांचा वापर
सत्येंद्रपाल लाडद यांच्या तक्रारीनुसार, संशयीत रणबीरसिंग खालसा यांच्या सांगण्यावरून फिर्यादी व साक्षीदारांच्या अंगावर फायर एक्सटिंगूशेर गॅस सोडून, दगडफेक करण्यात आली तसेच लोखंडी रॉड, तलवार, लाठ्या काठ्यांनी मारहाणी करीत गंभीर दुखापती करण्यात आल्या तसेच 5 रोजी गुरुद्वारामध्ये गुरुगोविंदसिंग जयंतीचा कार्यक्रमास विरोध करण्यात आला. या प्रकरणी संशयीत रणबीरसिंग खालसा, जगबीरसिंग हरप्रीत सिंग संधू, शाविंदरसिंग राजवंतसिंग, गुरप्रीतसिंग बसंतसिंग, संदीपसिंग भवरलाल, गुरिंदरसिंग लखबीरसिंग (जखमी असून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल), दर्शनसिंग सुखदेवसिंग खालसा, दलरसिंग अमीरसिंग, लालसिंग सिंगरसिंग, सुदेशसिंग बच्चनलाल, दारासिंग मखनसिंग, करतारसिंग जगरसिंग यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता तर काही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.
आरोपीच्या घरातून 43 बुलेट जप्त
अटकेतील आरोपी रणबीरसिंग खालसा याच्या गुरुद्वारातील घराची पोलिसांनी झडती घेतल्यानंतर त्यातून एसएलआर रायफल गनसारख्या दिसणार्या आठ एमएमच्या आठ बुलेट तसेच पिस्टलसाठी लागणार्या 45 एमएमच्या तब्बल 35 बुलेट व दोन मॅग्झीन जप्त करण्यात आल्या. आरोपी सध्या कोठडीत असल्याने या गुन्ह्यात त्यास पुन्हा नव्याने अटक केली जाणार आहे. आरोपीला हद्दपार करण्यासंदर्भात प्रांताधिकार्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

